दोन बातम्या वाचण्यात आल्या. दोन्ही बातम्या महिलांशी संबंधित.'पहिली म्हणजे 'महाराष्ट्र महिलांच्या तस्करीमध्ये दोन नंबरला पोचल्याची' आणि दुसरी म्हणजे 'माननीय प्रधानमंत्री साहेबांना कोईम्बतुरच्या महिला विद्यार्थिनींनी सॅनिटरी पॅड भेट दिल्याची.'
पहिल्या बातमीनुसार महाराष्ट्र देशात महिलांच्या तस्करीमध्ये दोन क्रमांकावर पोचला आहे. एक नंबरला पश्चिम बंगाल. २०१६ साली महिलांची तस्करी १०,११९ होऊन ती मागील वर्षीच्या तुलनेने २२ टक्क्यांनी वाढली होती. २०१५ साली ६८८७ केस पैकी ३०८७ मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायामध्ये (कलम ३६६ अ) फेकल्या गेले. एकंदरीत देशात महिलांच्या वाढलेल्या तस्करीच्या आकडेवारीमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांची नाराजी आणि वाढलेली चिंता ही अगदीच स्वाभाविक आहे.
हा आकडा वरचेवर वाढतच जात आहे ही लक्षणीय बाब आहे. नौकरी ,आणि प्रेमाचे अमिश दाखवून फसवल्या जाऊन महिलांची तस्करी होण्याचे प्रमाण हे मेट्रोसिटी मध्ये जास्त आहे. दिल्ली आणि मुंबई हे दोन्ही शहरे महिलांच्या तस्करीमध्ये अग्रगण्य आहेत. या शहरांच्या लखलखाट आणि भौतिक नजरेला भुरळ पाडणाऱ्या असलेल्या जीवन शैलीमुळे तरुण मुली ह्या रोजगाराच्या शोधात चुकीच्या ठिकाणी फसल्या जातात. बऱ्याच वेळेस एखाद्या भामट्याकडून मुलला फूस लावून प्रेमाचे, लग्नाचे आमिष दाखवून ह्या गैर मार्गाला लावले जाते. गरिबी आणि अशिक्षितपणामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना फसवून त्यांची तस्करी केली जाते. त्यांना परदेशात किंव्हा इतरत्र ठिकाणी वाम मार्गाला लावले जाते.
दुसरी बातमी कोईम्बतुरच्या महिला विद्यार्थ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना मासिक पाळीमध्ये वापरायचे सॅनिटरी पॅड पाठवले. यामध्ये सहा स्त्रियांना अटक झाली असून तीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमागचे मूळ कारण असे की प्रस्थापित सरकारने सॅनिटरी पॅडवर १२ टक्के जीएसटी लावला आहे.इतर बऱ्याच अनावश्यक गोष्टीवर कमी कर लावून स्त्रियांसाठी वयक्तिक स्वच्छतेबाबतीत अत्यावश्यक असणाऱ्या सॅनिटरी पॅड वर जास्त कर लावून अन्याय केल्याची भावना महिला वर्गामध्ये उत्पन्न झाली आहे. याआधी एवढा कर हा या पॅडवर नव्हता. एकीकडे शासन महिला सशक्तीकरण आणि संरक्षण या विषयावर आपण जागरूक असल्याचा आव आणते आणि दुसरीकडे सॅनिटरी पॅडवर कर वाढवून त्यांच्या वयक्तिक स्वच्छतेबद्दल इतकी असंवेदनशीलता दाखवून विरोधाभासी वागते. महाराष्ट्रातील औरंगाबाद मधूनही असेच सॅनिटरी पॅड प्रधानमंत्र्यांना जीएसटीचा निषेध म्हनून पाठवण्यात आले होते.
अशाप्रकारे देशात महिलांच्या संबंधात त्यांच्या 'अस्तित्वाचा' आणि सॅनिटरी पॅड संदर्भात 'अस्मितेचा' प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे देशात महिला वर्गात तसेच स्त्रीवादी
पुरुष नागरिकांत सरकार बाबतीत असंतोष पसरला आहे. सर्व थरांतून याचा निषेध होत आहे. हे खरं तर शासनाचे अपयश आहे. देशातील महिला वर्गाला नाराज करणे हे राजकीय दृष्टीकोनातून शासनास परवडणारे नाही आहे. इतरत्र ठिकाणी भारत शासन किती अपयशी ठरले हा समीक्षेचा विषय आहे परंतु स्त्रियांबद्दल मात्र नक्कीच कमी पडले आहे हे वरील प्रसंगावरून स्पष्ट होते. अपेक्षा आहे सरकार याबद्दल लवकरच योग्य तो निर्णय घेऊन महिलांना न्याय वागणूक देईल.
प्रेमकुमार शारदा ढगे, बाजाजनगर औरंगाबाद
९८६०३०३२१६
No comments:
Post a Comment