नगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला तो कोपर्डी गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने.
तसे पाहता ,बलात्कार , लैंगिक अत्याचार, विनयभंग , पीडितेच्या मृतदेहाची विटंबना हा प्रकार काही नवीन नाही भारत देशाला. दररोज ९० बलात्कार होणार आपला भारत देश आहे . (२०१४ च्या क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या सांख्यिकी नुसार) परंतु एखाद "निर्भया" प्रकरण होऊन जातं, आणि सगळ्या देशाला मस्तक आदळायला लावत. सगळ्या देशाची झोपलेली संवेदना जागी करतं
कोपर्डी प्रकरण सुद्धा "निर्भया" इतकेच संवेदनशील ,क्रूर आणि आख्या मानवजातीला काळिमा फासवनार आहे याबाबत दुमत नाही. परंतु ह्या प्रकरणाची झालेली राजकीय 'खिचडी' पाहून मात्र मन खिन्न होऊन जाते. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांणी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करून आपले इतिकर्तव्य पार पाडले आणि पुढेही पाडतील हीच अपेक्षा. आदरणीय न्यायालयावर तर आपला विश्वास आहेच.
निर्भयाच्या बाबतीत लोकांनी जी कमालीची संवेदनशीलता दाखवली ती खरचं कौतुकास्पद होती, आहे . सोशीअल मीडियावर सुद्धा हीच संवेदना पहायला मिळाली . निर्भयाची जात काय होती ? तिचे खरे नाव काय आहे ? हे आजही सर्वसामान्य जनतेला माहिती नाही. तिला फक्त एक पीडित भारतीय स्त्री आणि अबला समजल्या गेले. दिल्ली पासून कन्याकुमारीपर्यंत तरुणाईने सरकारचे धाबे दणाणून सोडले. त्याचाच परिपाक म्हनूण बालगुन्हेगारीबद्दल कायद्यातील बदललेली तरतुद आहे. प्रत्येक तरुण हा निर्भयाला फक्त एक भारतीय स्त्री म्हणून बघत होता. तिच्यासोबत घडलेल्या पाशवी अत्याचाराबद्दल सगळ्या भारतीय तरुणांच्या मनात द्वेष खदखदत होता. न्यायालयानेही जनतेचा रोष लक्षात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा केली. उशिरा का होइना परंतु निर्भयाला न्याय मिळाला.
कोपर्डी प्रकरणात मात्र ही संवेदना लोकं पूर्णतः विसरले. पीडितेचे खरे नाव तिच्या मृतदेहाचे फोटो सोशीअल मीडिया वर भराभर फिरू लागले. तिच्या जातीचा उल्लेख करून तिला एका विशिष्ट समाजपुरतेच बांधून ठेवले. हे सगळे करत असताना आपण समाजामध्ये अराजकता पसरवतोय याचे किंचितही भान नाही उरले या लोकांना. पीडितेचा फोटो आणि खरे नाव जाहीर केल्याने तिच्या कुटुंबाची होनारी कुचंबणा याला सुद्धा हेच लोक जबाबदार असतील. सगळे प्रकरण शांत झाल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना बघून एकमेकांच्या कानात होणारी कुजबुज ही त्यांच्या प्रतीष्ठेला संकुचित करणारी असेल, याचे भान ह्या गोष्टी शेअर करणाऱ्याने ठेवायला हवे होते. पीडितेचे खरे नाव आणि फोटो हा जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमे सुद्धा लपवत असते.कायद्याची संमती नसल्याने हे सौजन्य पाळल्या जाते. परंतु सोशीअल मीडियावर सुद्धा असले बंधन नाही. लोकांनी स्वयंस्फूर्तीने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सौजन्य दाखवायला हवे होते. तसे झाले नाही. पीडितेचा प्रतिष्ठेचे राजकारण करून आपली राजलीय पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांनी सुद्धा संवेदनेचे सगळे बंध तोडले , ह्या संवेदनशील प्रकरणाला जातीय आणि राजकीय रंग आनला ही सगळ्यात कमकुवत बाजू .
दुसरी गोष्ठ म्हणजे पीडितेच्या नातेवाईकांना दलित नेत्यांना भेटण्यास मज्जाव केला गेला. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राने या नेत्यांना ते 'दलित'च असल्याची जाणीव करून दिली. नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या घटनांनमध्ये आतापर्यंत पीडित हे दलित वरर्गातीलच लोकं होते. यावेळी त्यांना सगळ्या जाती धर्माचे राजकीय व्यक्तिमत्व भेट देऊन गेले. मात्र कोपर्डी प्रकरणात दलित नेत्यांना पीडितेच्या नातेवाइकांना भेटण्यास परवानगी नाकारणे कितपत योग्य आहे? कारण यावेळी अत्याचार करणारे दलित होते आणि पीडिता ही उच्च वर्गातली होती म्हणून ? परंतु आत्याचारी आणि आरोपीला कोणताही धर्म ,जात नसते. त्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजेच याबद्दल कुणाचेही दुमत नाही.
पीडितेच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीला वेगळेच वळण लागले. घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आख्या राज्यातून लाखोंचे मोर्चे निघाले. न भूतो न भविष्यती! असेच मोर्चे होते ते. तमाम मराठा वर्ग या मोरच्यांच्या निमित्ताने एकत्र आला. पण या मोर्चांमध्ये बलात्कार पीडितेच्या आरोपीच्या शिक्षेबरोबर, मराठा आरक्षण, अट्रोसिटी कायदा बंद करण्याची मागणी जोर धरू लागली. यामुळे परत दलित विरुद्ध मराठा असे चित्र पाहायला मिळाले. या मोर्चाचे फलित काय झाले हा खरं तर संशोधनाचा विषय आहे , पण या मोर्चानंतर दलित आणि मराठा समाजामध्ये एक अदृश्य अशी दरी पडली! वर्षानुवर्षे मित्र असणारे एकमेकांना शत्रू समजू लागले. एकमेकांपासून दुरावले गेले. मराठा क्रांतीमोर्चाविरुद्ध 'प्रतिमोर्चे' निघू लागले. दलितांनीही लाखोंच्या घरात मोर्चे काढले.सगळीकडं मराठा आरक्षण आणि अट्रोसिटी कायद्याचं राजकारण केल्या जाऊ लागलं. पण या मुळे मूळ पीडितेचा विषय बाजूला राहिला.
बघता बघता या गोष्टीला एक वर्ष झालं. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. निर्भया, बिलकीस बानो, यांच्याप्रमाणे लवकरच कोपर्डी प्रकारणाचाही निकाल लागेल ही अपेक्षा करूयात. तोपर्यंत सगळ्यांनी संयम बाळगणे गरजेजे आहे, कोणीही कायदा हातात घेता कामा नये. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली.
जे सौजन्य निर्भयासाठी जनतेने दाखवले ते कोपर्डीतील निर्भयासाठी दाखवले गेले नाहि याचे दुःख वाटते. पीडितेच्या जातीचे राजकारण केल्यामुळं मूळ गंभीर प्रश्न बाजूला राहून दुसऱ्याच गोष्टींमुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्या.मुळात स्त्रियांवरील बलात्कार ही पौरुषी विकृतीतून प्रकट झालेली नीच भावना आहे. यासाठी समाजावर आणि जणसामन्यावर कायद्याच्या धाकाबरोबरच वैचारिक प्रबोधन होणे ही तेवढेच गरजेचे आहे. बलात्कार होऊच नये याकरिता पुरुष जातीमध्ये स्त्रियांबद्दलचे सुसंस्कार आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.
प्रेमकुमार शारदा ढगे, बजाजनगर औरंगाबाद .
(९८६०३०३२१६)
premkumardhage.blogspot.com
No comments:
Post a Comment