Friday, 28 March 2025

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायाधीशाने लालचे पोटी भ्रष्टाचार करू नये म्हणून त्यांना भरपूर अशा मानधनाची सोय करून ठेवलेली आहे. निर्भीड आणि निष्पक्ष असा न्याय द्यावा यासाठी त्यांना भरपूर असे विशेष अधिकार दिलेले आहेत. परंतु न्यायाधीशाच्या घरी अशी बेहिशोबी मालमत्ता सापडणं म्हणजे भ्रष्टाचाराचे द्योतक आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणूस न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवेल का?  हा मोठा प्रश्न आहे. शिवाय जो न्याय मिळतो तो खरोखरच सत्याच्या कसोटीवर उतरतो का हाही प्रश्न आहे.

न्यायाधीशाची जबाबदारी ही केवळ कायदेशीर चौकटीतच नव्हे, तर नैतिकतेच्या उंच मापदंडांमध्येही मोजली जाते. जेव्हा ते नैतिकतेपासून दूर जातात, तेव्हा समाजाचा कायद्यावरचा विश्वास कमी होतो. म्हणूनच, न्यायाधीशांनी स्वतःला एका नैतिक पथदर्शकाच्या भूमिकेत ठेवणे आवश्यक आहे. त्यांचे वर्तन आणि निर्णय हे समाजासाठी प्रेरणादायी असावेत, जेणेकरून न्यायव्यवस्था ही खऱ्या अर्थाने लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब बनू शकेल.

न्यायाधीशांचे कार्य हे निःपक्षपाती, पारदर्शी आणि नीतिमान असणे अपेक्षित आहे. समाज त्यांच्याकडे एका आदर्श व्यक्ती म्हणून पाहतो, ज्यांचे निर्णय केवळ कायद्यावरच नव्हे, तर नैतिक मूल्यांवरही आधारित असावेत. जर एखादा न्यायाधीश स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा भ्रष्टाचारासाठी कायद्याचा गैरवापर करतो, तर तो केवळ स्वतःच्या विश्वासार्हतेचाच नव्हे, तर संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचा ऱ्हास करतो.

भ्रष्टाचारी न्यायाधीशाचे प्रकरण  जलद गतीने निपटून दोषी आढळल्यास सेवेतून तात्काळ बडतर्फ करून समाजामध्ये नवीन आदर्श घालून द्यावा. अन्यथा देशाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल आणि न्याय फक्त धनिष्ठ लोकांचाच आहे असा संदेश जनसामान्यांमध्ये पसरेल. न्यायमुर्ती वर्मा यांच्या घरी नोटा नाही तर प्रत्यक्षात न्याय जळत असल्याची भावना जनसामान्यांमध्ये झाली आहे.

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...