सेल्फीच्या नादात.....!
नागपूरच्या वेणा तलावात बुडून सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी सकाळी सकाळी वाचायला मिळाली. गुरू पोर्णिमेनिमित्त सहलीसाठी फिरायला गेलेल्या आठ तरुणांचा तलावात बुडून दुःखद अंत झाला. मद्यावस्थेत धुंद असलेल्या मित्रांना सेल्फीचा नादात नावेमध्ये पाणी गेल्याचे भान सुद्धा नाही आणि हा अपघात घडला.
खरं तर मोबाईलच्या नादात स्वतःचा जीव गमावल्याची ही तशी पहिली घटना नाही. मोबाईलचा शोध ही एकीविसाव्या शतकात घडलेली तांत्रिक उत्क्रांती इतर कोणत्याही शोधापेक्षा सरस ठरली. ही क्रांती बघता बघता हरएकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली. सगळं जग यामुळं एकमेकांच्या एवढ्या जवळ आलं की क्षणार्धात जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात बोलता येऊ लागलं, बघता येऊ लागलं. इंटरनेटच्या एका क्लिक वर सगळी माहिती मिळायला लागली. आयुष्याचे महत्वाचे क्षण चित्रित होऊ लागले.
पण प्रत्येक शास्त्रीय शोधाच्या ज्या प्रमाणे चांगल्या बाजू असतात त्याचप्रमाणे वाईटही बाजू असतात. सध्या सगळ्यांना प्रभावित केलेली वाटायला साधी असणारी पण आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव घेणारी बाब म्हणेज 'सेल्फी'! सेल्फी म्हणजे मोबाईलने स्वतःचा, स्वतःच काढलेला फोटो अशी साधी व्याख्या करूयात. पूर्वी मोठी प्रसिद्ध व्यक्ती किंव्हा नट नट्यांची आठवण म्हणून त्यांची स्वाक्षरी (ऑटोग्राफ) स्वतः कडे ठेऊन घेण्याची पद्धत असायची. या ऑटोग्राफची जागा आता सेल्फीने घेतली आहे. हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सेल्फीचं वेड पाहायला मिळत आहे. यामुळेच आजकाल मोबाईल कंपन्यासुद्धा विशेष सेल्फी फोन बाजारात आणत आहेत. इतकेच काय पण आपले माननीय प्रधानमंत्रीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसतात. असायला हवं. आधुनिक जगात आपल्याला कोणीही मागासलेले म्हणता कामा नये.
पण ही सेल्फीचा सवय जय जीवघेणी ठरत असेल तर मग मात्र आपण थोडं आत्मपरीक्षण करायला हवं. सेल्फीमुळे जर तरुणांचा जीव जात असेल तर ही चिंतेची बाब आहे! विशेष म्हणजे स्वचित्रामुळं (सेल्फी) आपला देश सेल्फीचा बळींमध्ये एक नंबरला पोचला आहे. आपल्या खालोखाल पाकिस्तान दोन नंबर आणि आधुनिक समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचा आठवा क्रमांक सेल्फीचा बळींमध्ये आहे.वेगवेगळ्या अवघड आणि धोक्याच्या ठिकाणी जाऊन स्वचित्र काढण्यात तरुणांना मोठा आनंद मिळतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून थरारक सेल्फी काढन्याची हल्ली फॅशनच झाली आहे. जगामध्ये २०१४ साली १५ , २०१५ साली ३९, आणि २०१६ साली ७३ लोकं सेल्फी मूळे मृत्यू पावल्याची नोंद आहे.हे प्रमाण वरचेवर वाढतच आहे. यामध्ये सगळ्यात जास्त भारतातील तरुण आहेत. एका संशोधनानुसार मुली ह्या मुलांपेक्षा जास्त सेल्फी काढतात परंतु तुलनेने ७५% मुलांच्या मृत्यूची संख्या ही जास्त आहे. मृत्यू पावलेल्या जास्तीत जास्त तरुणाचे वय हे २४ वर्षांपेक्षा कमी होते. म्हणूनच मुंबई सारख्या ठिकाणी वेगवेगळ्या आठरा ठिकाणी सेल्फी काढण्यास बंदी करण्यात आली आहे.
तेंव्हा या लेखाच्या निमित्ताने सर्व 'तरुण भारताला'' जीवघेण्या सेल्फीच्या आहारी न जाण्याचे आवाहन करत आहे. जीवघेणे सेल्फी काढून काहितरी पराक्रमी विक्रम करण्याचा मोह टाळा, इतरांनाही ते करण्यापासून परावृत्त करा. सुरक्षित रहा. कारण देशाला तुमची गरज आहे. आधुनिक जगात टेक्नोफ्रेंडली व्हा पण त्याच्या जीवघेण्या स्वरूपात नव्हे. 'सेल्फी' घ्या पण 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हे विसरू नका.
प्रेमकुमार शारदा ढगे. बजाजनगर , औरंगाबाद.
९८६०३०३२१६
No comments:
Post a Comment