Thursday, 18 May 2017

शिक्षणाच्या आईचा घो.!!

ओमप्रकाश चौटाला यांना मनःपूर्वक शुभेच्छा. यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ओंप्रकाशजी सध्या तिहार जेल मध्ये तुरुंगवास भोगत आहेत. ते हरियाणाचे सातवे मुख्यमंत्री होते. त्यावेळी 2000 साली त्यांनी शिक्षकांच्या भरतीचा (JBT Scam) महाघोटाळा केला. 3200 पेक्षाही जास्त अपात्र शिक्षकांना त्यांनी पदाचा गैरवापर करत भरती केले.यासाठी त्यांनी प्रतेक शिक्षकाकडून 3 ते 4 लाख रुपये लाच घेतली होती. 2013 साली त्यांना स्पेशल CBI कोर्टाने त्यांच्या मुलासह 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. आता सध्या त्यांची आठवण काढण्याचं कारण म्हणजे नुकतेच ते 82 व्या वर्षी 12 वि बोर्डाची मुक्त विद्यापीठाची परिक्षा तुरुंगातूनच पास झाले आहेत. म्हणजे स्वतः कमी शिक्षित असून येणाऱ्या पिढीला सुद्धा बोगस शिक्षकांची भरती करून देशाच्या भवीतव्याशी खेळण्याची सजा त्यांना भेटली! असो ... त्यांच्या शिक्षणाच्या जिद्दीला सलाम!...

राजकीय नेत्यांच्या शिक्षणाचा मुद्दा हा खरं तर कळीचा विषय आहे. राजकीय नेत्यांना शिक्षण घेणे जरुरी आहे किंव्हा नाही हा संशोधनाचा विषय आहे .कारण आपल्या संसदेमध्ये कितीतरी राजकीय नेते हे अल्पशिक्षित किंवा कमी शिक्षित मिळतील. काही नेत्यांच्या पदव्या तोतया असल्यामुळं सुद्धा ते खूप गाजले आहेत. सध्याच्या वस्त्रोदयोग मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदव्यांवरून सुद्धा उडालेला राजकीय धुरळा आजून निवळलेला नाही. पूर्वी राजकारणामध्ये उच्चविद्याविभूषित लोकांना महत्वाचे स्थान असायचे . महात्मा गांधी , डॉ. आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, न्या.रानडे असे बरेच निष्णात लोकं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणामध्ये सक्रिय होते. त्यामुळं राजकारण हे शिकलेल्या आणि तत्वज्ञानी लोकांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र होतं.

हल्ली राजकारण म्हणिजे पैसेवाले , बडे उद्योगपती, किंव्हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं असलेला अड्डा बनला आहे. सध्याच्या परिस्थितीत संसदेमध्ये निम्म्यापेक्षाही जास्त प्रतिनिधींवर गुन्हे आहेत. सध्याच्या संसदेमध्ये ३६% खासदारांवर गंभीर गुण्याच्या चार्जशीट दाखल आहेत.एकूण संसद सदस्यांच्या १०% सदस्य दहावी बोर्ड सुद्धा पास झालेले नाही आहेत. बऱ्याच लोकांना देशाच्या सामाजिक ,राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचा काहीही अभ्यास नाही. भारताचा भूगोल , इतिहास माहीत नाही असे अनेक तथाकथीत नेते आज संसदेच्या पावित्र्य स्थानावर जाऊन बसले आहेत. बरेच नेते असे आहेत ज्यांना संसदेमध्ये नेमकं काय चालले आहे याचं याच राजकीय भान अजिबात नसतं. बऱ्याच नेत्यांना राष्ट्रगीत येत नसल्याचे व्हाट्स अप विडिओ सुद्धा व्हायरल झाले होते. त्यांना फक्त खासदार किंव्हा आमदार म्हणून मिरवत बेगड्या प्रतिष्ठेचा बोथट मुलामा हवा असतो. देशहिताचे किंव्हा लोकहिताचे निर्णय घेण्याची मानसिक आणि शैक्षणिक बुद्धी त्यांच्याकडं नसते!

संविधान निर्मितीच्या वेळेस काँग्रेस गटाकडून फक्त शिक्षित लोकांनाच मतदान करण्याचा अधिकार देण्याची शिफारस करण्यात आली होती. डॉ.आंबेडकरांनी मोठ्या शिताफीने ती फेटाळून लावत सगळ्यांना समान मतदानाधिकाराचा आग्रह धरला. वरील सूचना जर उमेदवारांसाठी असती तर कदाचित बाबासाहेबांनी सकारात्मक विचारही केला असता. बाबाबासाहेब विदेशात शिकत असताना त्यांच्या सहकार्यांना समाजाच्या उद्धारासाठी केवळ शिक्षण आवश्यक असल्याचे संदेश पत्राने पाठवत असल्याचे पुरावे आहेत. म्हणूनच ते शिक्षणाला 'वाघिनेचे दूध' म्हणत असत.

अण्णांच्या लोकपाल आंदोलनाच्या वेळी प्रसिद्ध सिने अभिनेते स्वर्गीय ओम पुरी यांनी सुद्धा अण्णांना भेट देत , चपराशाच्या नोरीसाठी शिक्षण अनिवार्य आहे परंतु देश चालवणाऱ्या प्रतिनिधींनीनसाठी का नाही ?, असा खडा सवाल विचारला होता. शिक्षणाचा काहीही गंध नसलेले लोकं मंत्री होतात आणि उच्चशिक्षित कलेक्टर लेव्हलची व्यक्ती त्यांचे असिस्टंट होतात. किती विरोधाभास आहे!

शिक्षणाशिवाय देश प्रगतीची पायरी नाही चढू शकत.मग तो देशाचा विद्यार्थी असो , नेता असो, न्यायाधीश असो , किंव्हा मंत्री असो. अन्यथा ओमप्रकाश चौटाला सारखे देशाचे भवितव्य धुळीत मिळवणारे नेते आपल्याला भेटतच राहतील...!

ता.क.

लेखाच्या शिर्षकामध्ये 'आई' हा शब्द प्रतिकात्मक वापरला आहे.आईला बदनाम करन्याचा कोणताही उद्देश नाही.

प्रेमकुमार शारदा ढगे, बजाज नगर,औरंगाबाद
premkumar.dhage@gmail.com
( ९८६०३०३२१६ )

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...