Tuesday, 14 July 2020

दंडेलशाही!

गोष्ट आहे सुरतेची. तीच सुरत जीची छत्रपती शिवाजीमहाराजांनी अक्षरशः 'सूरत'च बिगडून टाकली होती. असो. या शहराची आठवण करण्याचं करण म्हणजे आठ जुलैला घडलेली घटना. कोरोना महामारीमुळे काही ठिकाणी लॉकडाऊन, काही ठिकाणी संचारबंदी, कुठे अंशतः संचारबंदी असले प्रकार चालू आहेत.सर्वसामान्य माणूस या संचारबंदी चे आपापल्या परीने पालन करण्याचा प्रयत्न करतोच. पण बऱ्याचदा मोठ्या घरातील राजकीय पार्श्वभूमी असलेले मस्तवाल लेकरं बापाची गाडी घेऊन तिच्यावर बापाच्या असलेल्या राजकीय पदाची बुरुदावली तसेच ठेवून सगळे नियम धाब्यावर बसवून बिनधास्त फिरत असतात. अशावेळी ट्रॅफिक पोलीस किंवा सामान्य कॉन्स्टेबल लेवल चे पदाधिकारी यांच्यात नादाला लागत नाहीत. शक्यतो हे यांच्याशी वाद घालत बसत नाहीत.मात्र बऱ्याचदा यांच्या सामना एखाद्या कर्तव्यदक्ष पोलीसाशी होत असतो आणि त्यातही जेव्हा पोलीस महिला असते तेव्हा खरी मजा येते. आता मात्र आपल्याला कल्पना आली असेल मी कोणाबद्दल बोलतोय? होय एलआर सुनीता यादव. यांच्याबद्दल बातमी आलेली आहे की, यांची बदली केली जात आहे.तसे पाहिले तर यांनी राजीनामा दिला होता परंतु  अधिकृतरित्या हा राजीनामा स्वीकारला नाही आहे म्हणे. 
 आपण सुद्धा, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सुनीता यादव यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला असेल.यामध्ये त्या गुजरातचे आरोग्यमंत्र्यांच्या मुलाला चांगलेच खडे बोल सूनवत आहेत. कर्फ्यू चालू असताना मंत्री असलेल्या बापाची गाडी घेऊन अवैधपणे दोन मित्रांसोबत फिरत असताना सुनीता यादव यांनी त्याला अडवलं. मात्र आपण मंत्र्यांचा मुलगा असल्याचा आव आणत तो त्यांच्याशी हुज्जत घालत होता.  लेडी सिंघम मात्र कायदा सर्वांना समान आहे असे सांगत त्याच्या बापालाच फोनवर बोलते आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या माघारी काय दिवे लावत आहेत हे त्यांना सांगते. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं ज्या पद्धतीने ही महिला कॉन्स्टेबल एका मंत्र्याला बोलते त्यावरून ती किती कर्तव्यदक्ष आहे याची कल्पना येते.नाहीतर हल्ली अनेक पोलीस मंत्र्यांची जी हुजरेगिरी करताना आपण बघतो. मंत्र्याची हुजरेगिरी करण्यातच त्यांना धन्यता वाटते. पोलीस खात्यावर राजकारण्यांचे किती नियंत्रित असते हे आपण सर्रास बघतो. त्यामध्ये असली एखादी महिला पोलीस सापडली म्हणजे कुणालाही नवलच हे वाटणारच.

एकीकडे विकास दुबेसारख्या कुख्यात गुंडाने सातआठ पोलिसांचा खात्मा केल्यावर पोलिसांची अस्मिता जागी होते अणि सरतेशेवटी त्याचा एन्काऊंटर केला जातो. एखाद्या आरोपीची मजल पोलिसांचा लोकांसमोर खात्मा करण्यापर्यंत कशी पोचते.? एवढी हिम्मत कुठून येते.? याच सोपं उदाहरण म्हणजे एलआर सुनीता यादव यांच्या सारख्या पोलीस कर्मचाऱ्यांची होत असलेली कुचंबणा.जेंव्हा एखादा पोलीस अधिकारी प्रामाणिकपणे कर्तव्याचे पालन करत असतो तेंव्हा त्याला राजकीय दबावाखाली बोटावर खेळवले जाते. अशाप्रकारे पोलिस कर्मचारी किंवा मोठमोठे अधिकारी या राजकीय मातब्बरांच्या हाताचे खेळणे बनतात.देशाममध्ये अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातम्या आपण वाचल्या किंवा ऐकल्या असतील. त्यामागे काहीअंशी त्यांची राजकीय दबावापोटी होत असलेली घुसमट सुद्धा कारणीभूत आहे.

प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी यांना संरक्षण देणे हे देशाचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. असले कर्तव्यदक्ष अधिकारी हे वाचले पाहिजेत. देशाला बलशाली करण्यासाठी अशा कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांची गरज आहे. भ्रष्ट आणि लाचखोर अधिकारी हे देशाला खिळखिळ करून टाकतील. देशाला वाचवायचे असेल तर आपण असल्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे.आपणच ही राजकरण्यांची 'दंडेलशाही' थोपवू शकतो.

अन्यथा देशाला लागलेली भ्रष्ट, लाचार आणि लाचखोर राजकारण्यांची कीड सगळा देशच पोकळ करून टाकतील.

प्रेमकुमार शारदा ढगे
9860303216

1 comment:

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...