सध्या २१ तारखेच्या रात्रीपर्यंत आलेल्या सूचनेप्रमाणे देशात २७३ वर कोरोना रुग्णांची संख्या पोचली आहे. सध्या तरी देश दुसऱ्या स्टेज वर आहे.पहिल्या स्टेजमध्ये परदेशी रुग्ण ह्या रोगाचा विषाणू देशामध्ये येऊन पसरवतात. दुसऱ्या स्टेज मध्ये देशातील बाधित नागरिक हा रोगाचा प्रसार करत असतात.तिसऱ्या स्टेज मध्ये याचा प्रादुर्भाव वेगाने झालेला असतो आणि चौथ्या स्टेजला हा रोग नियंत्रणाबाहेर निघून जातो.अशावेळी ह्या रोगावर नियंत्रण करणे हे सरकार आणि प्रशासनासमोरील मोठे आव्हान असते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा मुख्यतः बाधित व्यक्तच्या संपर्कात निरोही व्यक्तीचे जाणे हाच आहे. कोणत्याही करणाने जर निरोगी व्यक्ती बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली की त्या व्यक्तीला सुद्धा त्या विषाणूची लागण होते. म्हणजे बाधित व्यक्तीने निरोगी लोकांच्या संपर्कात जाणे किंवा निरोगी व्यक्तीने बाधित व्यक्तीचा संपर्कात जाणे हे या कोरोना विषाणूच्या प्रसाराचे मुख्य कारण आहे.
यावर खबरदारी म्हजून मोदीजींनी लोकांना २२ तारखेला घराबाहेर न पडण्याचे आव्हान केले. त्यासाठी त्यांनी दोन तीन दिवस आधीच लोकांना जागृत केले. मात्र त्याचा परिणाम असा झाला की कर्फ्यु रविवारी होता म्हणून राज्यातील सगळ्या लोकांनी आपापल्या घरी परतण्यास सुरुवात केली.ही घरवापसी इतकी प्रचंड प्रमाणात होती की अक्षरशः पुणे आणि मुंबईची वाहतूक यंत्रणा तोकडी पडत होती. पुण्याच्या रेल्वेस्थानकावर लोकांना पाय ठेवायला सुद्धा जागा उरली नव्हती. उत्तर प्रदेश ,बिहार राज्यातून आलेले लोकं परत आपापल्या राज्यात जाण्यासाठी धरपड करत होते. हे सगळं करत असताना आपण कोरोनाला अजूनच पसरवण्याची किती जोखीम घेत आहोत हे लक्षात येत नव्हतं कुणाच्याच.कारण ह्या एक दिवसात जेवढ्या लोकांनी प्रवास केला आहे त्यापैकी एकजण जरी बाधित असता तरी किती मोठी जोखीम आपण पत्करत आहोत याची कुणालाही जाणीव नसावी हे दुर्दैव आहे.बाधित रुग्णांने इकडून तिकडे प्रवास करणे हे एकमेव कारण आहे कोरोणाच्या प्रसाराचे. हा बाधित रुग्ण रेल्वेस्थानकावर या विषाणूचा प्रसार करून इतरत्र आपल्या गावच्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे.याचाच अर्थ तो सगळीकडे या विषाणूचा प्रसार करणार आहे.
शनिवार २१ तारखेच्या रात्री इतक्या लोकांनी प्रवास केला की दस्तुरखुद्द नरेंद्र मोदींजींना ट्विट करून जनतेला सांगावं लागलं की बाबांनो घराच्या बाहेर पडू नका.जिथे आहेत तिथेच राहा.प्रवास करून आपल्या परिवाराची काळजी वाढवू नका. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.
खरं तर मोदींजींनी हे आवाहन जनतेला सुरुवातीलाच करायला हवं होतं. कर्फ्यु लागू केल्यावर जी परिस्थिती उद्भवनार आहे त्याची कल्पना त्यांना आधीच यायला हवी होती. नोटबंदीच्या वेळीसुद्धा असंच झालं होतं. बँकांमध्ये करोडो रुपये येऊन पडले होते पण ते एटीम मधून लोकांना काढता येऊ शकत नव्हते कारण त्या नोटा उपस्थित एटीम साठी सुयोग्य नव्हत्या. नवीन आलेल्या नोटांची साईज ही जुन्या नोटांच्या तुलनेनं छोटी असल्या कारणानं त्या उपस्थित एटीम मधून बाहेर पडू शकत नव्हत्या. पैसा तर उपलब्ध होता परंतु तो लोकांना वाटण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती.संपूर्ण देशातील एटीम बदलण्यास जवळपास तीन ते चार महिन्याचा कालावधी लागला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लोकांची जी दुरवस्था झाली होती ती सरकार टाळू शकत नव्हतं.
शासनाच्या या अनुभवावरून असं वाटतं की कोणतीही आणीबाणीची परिस्थिती असो वा कायद्याची अंमलबजावणी असो त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. कायद्यातील गुणदोष, त्याचे जनतेवर होनारे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम, याचा पूर्ण अभ्यास करूनच मग तो कायदा अमलात आणायला हवा.संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्यावरच निर्णय घ्यायला हवा.धीसाडघाईला येऊन निर्णय घेतल्यावर जी बेजारी होणार आहे त्यामध्ये आपलीच शक्ती वाया जाणार हे मात्र नक्की. तूर्तास आपण सर्वांनी कोरोनाशी लढण्यास स्वतःला सिद्ध केले पाहिजे.देशावर जे नैसर्गिक संकट आलं आहे त्यासाठी सगळ्यानी प्रशासनाला सहकार्य करायला हवं. आपली आणी आपल्या प्रियजनांसोबतच इतरांचीही काळजी घ्यायला हवी. तरच आपण या आस्मानी संकटातून सुखरूप बाहेर पडू!
प्रेमकुमार शारदा ढगे
9860303216
No comments:
Post a Comment