Wednesday, 21 August 2019

हे शहर कधी कुणाला प्रश्न विचारत नाही

 हे शहर कधी  कुणाला प्रश्न विचारत नाही!

औरंगजेबाच्या दरबारात धाकल्या छत्रपतींचा छळ होतो
हा मुघल बादशहा शहराला बावन्न दरवाज्यांनी जायबंदी करतो
मात्र हे शहर कधी  कुणाला प्रश्न विचारत नाही!

छोटा ताजमहालाचा घमंडी तोरा मिरवत असतं
बुद्धांच्या लेण्यांनी लीलया नटलेलं पर्यटनाचं वैभव आहे
मात्र हे शहर कधी कुणाला प्रश्न विचारत नाही!

स्वातंत्र्याच्या नंतर एका वर्षाने हे शहर देशाशी जोडल्या जातं
मुक्तीसंग्रामात कित्येक जणांच्या रक्ताने इथली जमीन तहान भागवते
मात्र हे शहर कुणाला प्रश्न विचारत नाही!

गाव वस्त्या  हळूहळू पाय पसरू लागतात
बघता बघता आशिया खंडात वेगानं विकसीत होत जातं
मात्र हे शांत कुणाला प्रश्न विचारत नाही!

इथं आहेत अनेक जखमा भळभळलेल्या
विद्यापीठाच्या नामांतरासाठी कित्येक वस्त्या जळालेल्या
मात्र हे शहर कधी कुणाला प्रश्न विचारत नाही!

दीडशे मर्सडीज एकदाच खपून विश्व विक्रम बनतो
राज्याला हादरवणार मराठा क्रांती मोर्चा इथूनच सुरू होतो
मात्र हे शहर कधी कुणाला प्रश्न विचारत नाही!

हल्ली हिंदू-मुस्लिम दंग्यांमध्ये व्यस्त असतं
कचऱ्याच्या प्रश्नामुळं भांबावून सोडतयं
मात्र हे शहर कधी कुणाला प्रश्न विचारत नाही!

भीमा कोरेगावानंतर सगळ्यात जास्त लोकं इथं अटक होतात
क्रांती मोर्च्याने अनेक कंपन्या उध्वस्त केलेल्या असतात
मात्र हे शहर कधी कुणाला प्रश्न विचारत नाही!

स्वतःला याचा बॉस समजणारे कित्येक महारथी आले आणि गेले
आजूनही येतील आणि जातील....
मात्र हे शहर कधी कुणाला प्रश्न विचारत नाही!

प्रेमकुमार शारदा ढगे (प्रेशाढ)
9860303216

1 comment:

  1. खरच हे शहर कधी कुणाला प्रश्न विचारत नाही..

    ReplyDelete

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...