वेलकम बॅक गणपती बाप्पा. तू आला म्हणजे कसं मनाला जो या आस्सीम आनंद होतो त्याला पारावार उरत नाही. तुझं येणं म्हणजे अगदी शाही थाटात असत. ढोल ताशा, नगाडे गुलाल , फटाके काय काय नि काय काय!
बाप्पा सद्याच्या काळात तू बघत असशील सगळ्यात जास्त तुझे कोणी भक्त असतील तर ते म्हणजे भारतातील तरुणाई. डोक्याला फेटा, पांढरीशुभ्र शेरवानी ,तिच्यावर सात आठ फुटाचा रेशमी रुमाल कपाळाला भगवा अष्टगंध, पायात कोल्हापुरी उजव्या, मनगटावर भगवा धागा आणि त्याच हातात कमरेवरच्या भल्या मोठ्या ढोलाला पाठीमागे सत्तर डिग्रीच्या कोनात वाकून दणादण वाजवताना भक्त पाहिला की आपोआप भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
गजानना तुझ्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असलेला हा तुझा तरुण भक्त वर्ग तुझ्या येण्यासाठीच्या तयारीमध्ये एकदोन महिने आधीच तासंतास प्रॅक्टिस करत बसलेला असतो. निदान एका महिन्यापासून तरी मी बघतोय प्रत्येक मंदिराबाहेर किमान वीस बावीस तरुण युवक मंडळी तुझ्या आगमनाच्या तयारीच्या नावाखाली ढोल पिटाळात बसलेले असतात. यामध्ये महाविद्यालयीन आणि शिक्षण संपलेले युवकच जास्त असतात. देवा , मला सांग ह्या अवांतर तयारीची खरोखरचं गरज आहे का रे? म्हणजे हा युवक आलेला तरुण वर्ग निव्वळ ढोल वाजवण्यासाठी म्हणून चक्कपैकी महिनाभर आधीच स्वतःला व्यस्त करुण घेतो, इतका का तो बेरोजगार आहे..? तो बेरोजगार असणं हा किती प्रमाणात "राजकीय" प्रश्न आहे हा भाग वेगळा आहे; पण जे आहे ते सत्य आहे. आपल्या तरुणाला निव्वळ ढोल वाजवन्यासाठी एवढा वेळ मिळतोच कसा..? जगात सगळ्यात जास्त तरुण असल्याची बुरुदावली मिरवणाऱ्या देशात हाच तरुण इतका रिकामटेकडा असणं हे खरंच योग्य आहे का? ह्या तरुण पिढीने योग्य त्या ठिकाणीे चातुर्य आणि बुद्धी वापरून स्वतःचा आणि देशाचा विकास करायचा सोडून ते ढोल पिटाळण्यात धन्यता मानतात हे केवळ देशाचं दुर्दैव आहे! ऐन उमेदीच्या काळात भारतीय तरुण स्वतःचा 'टलेंट' आणि 'पोटेन्शल' जर असा खर्च करत असेल तर उद्या देशाचे भवितव्य काय असणार हा मोठा प्रश्नच आहे!
माणसाने नक्कीच श्रद्धाळू असलं पाहिजे. पण श्रद्धेच्या नावाखाली आपल्या सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीला खीळ बसता कामा नये. गणपतीचे दहा दिवस तर मौजमजा चालतच असते. शिवाय हा सण राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार आहे. त्यामुळे का होईना पण सगळा समाज एकत्र येत असतो. त्यामुळं याला काही हरकत असण्याचे कारणच नाही. पण महिनाभर आधीच कित्येक तास तरुणांनी वेळ फुकट वाया घालवणे हे आपल्या राष्ट्रीय प्रगतीचे दर्शन घडवते. देव धर्माच्या नावाखाली ढोल पिटणाऱ्या तरुणापेक्षा महिन्याला घर खर्चात हातभार लावणारा तरुण मुलगा कोणत्याही पालकांना आवडेल.
तेंव्हा गणराया, तुझ्या पुढच्या आगमनाच्यावेळी बहुतांश तरुणांना महिनाभर आधीच ढोल वाजवत बसवण्यापेक्षा त्यांना रोजगार मिळून देऊन त्यांचा खराखुरा सुखकर्ता आणि विघ्नहर्ता बन हीच प्रार्थना!
प्रेमकुमार शारदा ढगे, नागसेनवन औरंगाबाद
(मुक्त पत्रकार, 9860303216)
No comments:
Post a Comment