बाबाची आज सुनावणी होणार असते. त्याचं जे घोंगडं पंधरा वर्षापासून भिजत पडलं होतं त्याचा आज निकाल लागणार असतो. म्हणून दोन तीन दिवसापासूनच बाबाचे भक्त कोर्टाकडे चकरा मारायला लागतात. सगळीकडे एक अस्वस्थता पसरलेली असते. कारण काय होणार हे कुणालाही माहिती नसतं. तशी कोर्टामध्ये जाण्याची बाबाची ही काही पहिली वेळ नाही पण आज जरा वेगळंच वातावरण तयार झालं होतं. शेवटी बाबा कोर्टाकडे रवाना होतात. जवळपास सातआठशे गाड्यांच्या ताफ्यासोबत बाबा शक्तिप्रदर्शन करत प्रस्थान करतात. शेवटी न्यायालय बाबांना दोषी ठरवतं आणि निकाल राखून ठेवतं. मग काय हाहा म्हणता कोर्टाबाहेर जमलेले बाबांचे भक्तगण सगळीकडे जाळपोळ करतात. आणि याचं पर्यावसान दंगली मध्ये होतं. या दंगलीत जवळपास २५-३० जण आपला जीव गमावून बसतात. प्रशासन हतबल होऊन जातं. सगळी परिस्थिती हाताबाहेर निघून जाते.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी हि कथा कुणाची आहे हे लक्षात आलं असेलच. हो अगदी बरोबर! गुरमित राम रहीम सिंग. हिंदु मुस्लिम आणि शीख आशा तीन्ही धर्मांचा प्रतिनिधी असलेला हा बाबा. उत्तर भारतात प्रसिद्ध असलेला हा बाबा. 'डेरा सच्चा सौदा' नावाचा त्याचा प्रसिद्ध मठ. हा बाबा तसा देवाचा भक्तच. या भक्ताच्या मठात शेकडो तरुण स्त्रिया याच्या सेवेसाठी. आणि याच स्त्रियांचं तिथे भक्तीच्या नावाखाली लैंगिक शोषण व्हायचं. हा देवभक्त एक उत्तम गायक, आणि अभिनेता सुद्धा आहे! तेथील एका महिला शिष्याने २००२ साली त्याच्या हा कुकर्मांची कहाणी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लेखी निनावी पत्राद्वारे कळवली होती आणि तिथून पुढे ह्या नकली बाबाचे बिंग फुटले. देशाला असल्या अनेक बाबांची (नकली बाबांची) सवयच झाली आहे. यामध्ये आसाराम बापू, स्वामी नित्यानंद बाबा, रामपाल बाबा, असल्या अनेक नकली देवभक्तांची नावे घेता येतील.
तब्बल पंधरा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या खटल्याची सुनावणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी पूर्ण झाली. याबाबतची शिक्षा न्यायालयाने राखून ठेवली आहे. न्यायालयाने या गुरूला दोषी ठरवतात न्यायालयाबाहेर हिंसाचाराचे सावट पसरले. बाबा समर्थक भक्त लोकं आणि पोलीस, निमलष्करी,लष्करी दले यांच्यातील धुमश्चक्रीत २०-३० जण ठार झाले.
या घटनेनंतर अनाहूतपणे मला आठवण झाली ती निर्भयाच्या घटनेचे. कारण दोन्ही घटना ह्या बलात्काराशी निगडित होत्या. फरक एवढाच होता की निर्भया प्रकरणामध्ये तरुणाईने सरकारला हादरून सोडले होते एका निरपराध मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी. बलात्कारी पुरुषांना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी. पण रामराहिम सिंग संदर्भात मात्र त्याला कोर्टाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. असे असताना सुद्धा त्याच्या समर्थानात लाखों लोकं सरकार विरोधात निदर्शने करतात हे आपल्या विकृत आणि ढासाळलेल्या मनोवृत्तीचे दर्शकच आहे. आज आपण एका बलात्कारी पुरुषाला वाचवण्यासाठी सरकारच्या विरोधात, न्यायालयाच्या विरोधात हिंसा करतोय म्हणजे आपला देश नेमका कुठे चाललाय याचं आत्मपरीक्षण व्हायला हवं. स्त्रीला देवीचा दर्जा देऊन तिची पूजा करणाऱ्या भारतात आज तिच्या अभ्रूचे लक्तरे निर्लज्जपणे वेशीला टांगणाऱ्याला आपण वाचवण्याचा आटापिटा करतोय. हीच का आपली संस्कृती? आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचं समर्थन करतोय याच यत्किंचितही भान नसावं का बरं या तरुणाईला..? खरोखरच आपण मार्ग तर नाही ना भटकलो.? बलात्कारी व्यक्तीला अभय देऊन आपण समाजामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा अपमान नाही का करत?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि त्यातून तरुणाईने योग्य तो मार्ग स्वीकारला तरच आपला देश हा स्त्रीयासंबंधीत शुभचिंतक आणि सक्षमीकरणाकडे घेऊन जाणारा ठरेल. स्त्रियांच्या आत्मसमान,अभ्रू आणि संरक्षणासाठी कुठेही तडजोड केल्या जाऊ नये हाच खरा स्त्रियांचा सन्मान होय. लोकांनी स्वतःची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून योग्य आणि नकली देवभक्तांची पारख ठेवावी. आगोदरच भारतासारख्या धर्मभोळ्या लोकांचा फायदा घेणारे अनेक महाभाग या देशाचा फायदा घेऊन गेले. ढोंगी आणि विवेकी धर्मगुरुंमधला फरक जनतेने ओळखला पाहिजे. पावित्र्य आणि पाखंड यामधला फरक ओळखला पाहिजे. नाहीतर असले ढोंगी आणि कपटी बाबा आपल्याला मिळतच राहतील आणि धर्माच्या आणि देवाच्या नावावर आपली लूट आणि फसवणूक होतच राहील.
दैनिक केसरी मध्ये पुर्वप्रकाशीत (२७ ऑगस्ट, रविवार)
प्रेमकुमार शारदा ढगे
No comments:
Post a Comment