जगात झाली फिक्स भिम जयंती १२६ म्हणत बाबासाहेबांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती आली. या निमित्ताने हा लेख प्रपंच! लेखणीचा सम्राट असलेल्या व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेण्याचं धाडस माझी भाबडी लेखणी करते आहे. बाबासाहेब तसे एका लेखात किंवा एखाद्या ग्रंथात बंदिस्त होणारं व्यक्तिमत्व नाहीच आहे.
जयंती म्हणजे बाबसाहेबांचे सच्चे अनुयायी असणाऱ्यांना तर वर्षातून एकदाच येणारी सुवर्ण पर्वणीच. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच जयंतीच्या कमिट्या आणि त्यांचे अध्यक्ष यांचा बोलबाला चालू होतो. जयंतीची पट्टी मागण्यापासून ते डीजे वर नाचण्यापर्यंत सगळ्या गोष्टींना सुव्यवस्थित नियोजन लागतं! मग बाबांच्या जयंतीच्या नावाखाली सगळा धसमुसळेपणा, मोडलेला कायदे, भले मग तो बाबासाहेबांनीच का लिहलेला असेना, माफ असतात आम्हा भीमसैनिकांना. आणि का नसू नये जयंती थोडेच वारंवार होत असते!
14 एप्रिलचा सूर्य अखंड भारत विश्वाला बदलन्यासाठीच उजाडला. रामजी आणि भिमाई दाम्पत्याच्या नशिबाला चौदावा रत्न भीमाचा जन्म झाला. पुढे हाच भीमराव सगळ्यांचे साहेब, बाबासाहेब होईन हे कदाचित त्या वेळेच्या कर्मठ काळालाही माहिती नसावं. स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ म्हणजे सामाजिक बदलाच्या दृष्टीने फार महत्वाचा होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांनी देदीप्यमान असं शैक्षणिक यश मिळवलं होते. त्याकाळात त्यांच्या येवढ्या पदव्या मिळवणारा व्यक्ती त्यावेळेसही नव्हता आणि आताही कदाचितच असेल.
बाबासाहेबांच्या संघर्षमय आयुष्यातील त्यांची सगळ्यात मोठी कमाई काय असेल, तर ते म्हणजे भारत देशाचं संविधान! हे संविधान बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून तब्बल दोन वर्ष , आकरा महिने आणि सतरा दिवसांत पूर्ण केले. संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठे लिखित संविधान म्हणून आपल्या संविधानाची प्रशंसा केली जाते. लोकशाहीची मूलतत्त्वे असलेल्या समता , स्वातंत्र्य ,बंधुता, या त्रिमूल्यांचे समतोल सुसूत्रीकरण आपल्या संविधानामध्ये ओतप्रोत झालेले दिसते. खरं तर संविधान इतर देशांपेक्षा वेगळं असण्याची आजूनही बरीच कारणे आहेत.
मूळ ३९५ कलम असलेले संविधान हे २६ जानेवारी १९५० रोजी देशाने स्वीकारले. संविधानाच्या प्रस्ताविकेमध्येच संपूर्ण संविधानाचा सारांश पाहायला मिळतो. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायच्या माध्यमातून समाजातील सर्व गरीब आणि मागास वर्गाला मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली आहे. प्रत्येक राज्याला शासन व्यवस्थेत सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती मार्गदर्शक तत्वे चौथ्या परिशिष्टात समाविष्ट केलेली आहेत. भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली असल्याने, या पद्धतीत देशाच्या सत्तेचे नियंत्रण फक्त एकाच व्यक्ती किंवा संस्थेच्या हाती नसने हे खूप महत्वाचे प्रयोजन आहे. देशाचे कायदे करण्याचा अधिकार जरी संसदेला असला तरी या कायद्यांचे योग्य अर्थ लावण्याचा व ते संवैधानिक असल्याचा पाठपुरावा करण्याचा मौलिक अधिकार हा सन्माननीय न्यायालयांना आहे. न्यायालयीन पुनर्विलोकणाचा अधिकार (मूलभूत अधिकारांवर गदा आल्यास न्यायालयाला जाब विचारण्याचा अधिकार) तर या दृष्टीकोनातून जनसामान्यांचे मोठे हत्यारचं म्हणावं लागेल. देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना संविधानाचा आत्मा म्हटल्या गेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, जीविताचे स्वातंत्र्य संरक्षण आणि लिंगभेद व जातीभेदाचे उच्चाटन हे मूलभूत अधिकारांमध्येच केले गेले आहे. स्त्रियांचे सरंक्षण आणि सक्षमीकरणासाठी सुद्धा संविधानामध्ये विशेष तरतुदी आहेत. संविधानाची निर्मिती करतेवेळेस बाबासाहेबांनी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास केला होता. तसेच अनेक दशांनी त्यांच्या संविधान निर्मितीत आपल्या देशाच्या संविधानचा आधार घेतला आहे. आशा प्रकारे एक ना अनेक वैशिष्टयांमुळे आपल्या देशाचे संविधान हे विशिष्ट ठरते.
बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत असताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करणे आगत्याचे ठरते. स्वतंत्र भारताचे पाहिले कायदामंत्री असल्या बहुमान त्यांनाच मिळतो. संपूर्ण कारकिर्दीत कायदा मांत्रालय , मजूर मंत्रालय , सर्वजनिक बांधकाम मंत्रालय असे विविध क्षेत्र त्यांनी लीलया गाजवले आहेत. मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, अशा विविध नियतकालिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आपले निर्भीड आणि मुक्त विचार ते या वृत्तपत्रातून व्यक्त करत. प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, हू वेअर द शूद्राज, बुद्ध आणि त्याचा धम्म अशा विविध ग्रंथांचे लेखनही केले. बाबासाहेब आयुष्यभर विद्यार्थी होते. विद्यार्थी दशतेत असताना त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आठ वर्षाचा अभ्यासकाम अडीच वर्षात पूर्ण केला त्यासाठी त्यांनी दिवसाचे अठरा तास अभ्यास केल्याची नोंद आहे. उत्तुंग अर्थशास्त्रज्ञ , कायदे पंडित, मानववंश शास्त्रज्ञ , असली कित्येक विशेषणं त्यांच्या बाबतीत वापरली जातात. जगातील सर्वांत विद्वान लोकांमध्ये त्यांचे नाव भारत देशातून अग्रस्थानी आहे.
बाबासाहेबांच्या चळवळीच्या सध्य परिस्थितीचा ऊहापोह केल्याशिवाय हा लेख पूर्णच होणार नाही. आंबेडकरी चळवळीचे बाबसाहेबांच्या नंतर मात्र तीन तेरा वाजले. प्रयत्नांची पराकाष्टा करत बाबासाहेबांनी ओढत आणलेला क्रांती रथ त्यांच्या अनुयायांना पुढे खेचता नाही आला . त्यांच्या भारतीय रिपब्लिक पक्षाचे अक्षरशः तुकडे झाले. एकेकाळी विरोधी पक्षाची भूमिका गाजवणारा हा पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सगळ्यात वाईट परिस्थिती आहे ती या चळवळीत काम करणाऱ्या तरुण आणि स्वभामिनी युवकाची. कारण त्यांचे तथाकथित नेते हे स्वार्थापोटी आंबेडकरोत्तर पक्षांना विकले गेले. काही नेते नवीन एका पक्षाची स्थापना करत स्वतः दुबळे बनले. आंबेडकरी नेत्यांच्या स्वार्थी आणि धनलोलुप वृत्तीमुळं आंबेडकरी चळवळ प्रस्थापितांच्या दावणीला बांधली गेली. काहींनी आम्ही स्वाभिमानी आहोत म्हणत स्वतंत्र आंबेडकरी पक्ष स्थापन केले. पक्ष स्थापन केले परंतु ते बांसाहेबांसारखे सर्व बहुजनांना पर्याय देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत हा तरुण वर्ग भरकटलेल्या वादळासारखा बेकामाचा पालापाचोळा गोळा करत दिशाविहिन झाला आहे. या प्रत्येक तरुणांमध्ये एक कार्यकर्ता आहे , परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन करत समाजाला पुढे नेणारा पुढारी नाही आहे. आजही या तरुणाला आणि पर्यायाने आंबेडकरी चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज आहे.
जेंव्हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये , नेत्यांमध्ये या बाबतची जागृती होईल तेंव्हाच बाबासाहेबांचं या देशातील सत्ताधारी लोकं बनण्याचं स्वप्न साकार होईल. जयंतीच्या नावाखाली चाललेला आडमुठेपणा बंद करायला हवा. तरुणांनी शिक्षण घेऊनच राजकारणामध्ये प्रवेश करायला हवा. बाबासाहेबांच्या उपदेशांचे पालन आणि आचरण हीच त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने खरी आदरांजली होईल.
प्रेमकुमार शारदा ढगे(९८६०३०३२१६)
Premkumar.dhage@gmail.com
No comments:
Post a Comment