Saturday, 15 April 2017

पुन्हा शीतल नको!

आज पुन्हा एकदा पुरोगामीत्वाला आणि आधुनिकतेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली. लातूर मधील शीतल वायाळ या एकवीस वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण काय असेल तर , स्वतःला संपवून बापाच्या डोक्यावरील हुंड्याचं ओझं कमी करणे! शेतकरी असलेल्या बापाच्या मुलीचं शेवटचं पत्र, हे अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच संवेदनशील व्यक्तीच्या छाताडात घुसून काळीज पिळून टाकणारं आहे. सततच्या दुष्काळ आणि गरिबीमुळं सलग पाच वर्षे शीतलचं लग्न पुढे ढकलल्या जात होतं.शेवटी बापाची होणारी धावपळ आणि कारूणिक स्थिती तिला न सहन झाल्यामुळे,  नैराश्यातून तिने आत्महत्या केली. एक स्त्रीवादी व्यक्ती असल्यामुळे मी स्वतःला हा लेख लिहण्यापासून थांबवू शकलो नाही. गरिबी , दुष्काळ,  शेतकी कर्ज वगैरे ह्या राजकीय बाबी थोड्या बाजूला ठेऊन थोडं नैतिक मुद्यांवर मला बोलायला आवडेल.

नेहमीच पुरोगामी समजला जाणारा भारत देश आणि त्यातही महाराष्ट म्हणजे सगळ्यात आधुनिक, तसेच जवळपास, सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक, आर्थिक अशा सगळ्याच चळवळींचा प्रदेश. ह्याच महाराष्ट्रातून देशाला पहिली महिला राष्ट्रपती मिळाली. याच महाराष्ट्रातून अखंड देशातील स्त्रियांना शिक्षणाचा आणि आत्मउन्नत्तीचा मार्ग दाखवणारी भारतातील पहिला महिला शिक्षिका मिळाली. असली अनेक उदाहरणे देता येतील, महाराष्ट्रातील आधुनिक स्त्रियांच्या उच्चतम दर्जा बद्दल. पण आजही या पुरोगामी महाराष्ट्राला हुंड्याची प्रथा ही वाळवी लागल्याप्रमाणे आतून पोखरत चालली आहे! देशातल्या अनेक प्रथा ज्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेची मानहानी करणाऱ्या होत्या त्या काळानुरूप बंद झाल्या. सतीप्रथा, विधवांचे केशवपन, जरठकुमारी विवाह अशी अनेक उदाहरणे आहेत.

समाजाने अनेक जुन्या परंपरा मोडीत काढत आधुनिक परंपरा आत्मसात केल्या, पण लग्नामध्ये मुलीच्या बापाकडून पैसे किंवा दागिन्यांच्या स्वरूपात हुंडा घेण्याच्या प्रथेला अबोल दुजोरा आजही  दिला जातो. कारण यामध्ये मुलीच्या बापाकडून येणारा पैसा हा भावी दाम्पत्याच्या पुढील आयुष्यात वापरला जातो. ह्या हुंड्याच्या प्रथेमध्ये मुलीच्या बापाणेही कधी काळी एका  मुलीच्या बापाकडून हुंडा घेतलेला असतो, त्यामुळे तो ती प्रथा तशीच वारसा रूपाने पुढच्या पिढीच्या मस्तकी आदळतो. अशा प्रकारे ही प्रथा पिढी दर पिढी पुढे चालत आली आहे.

एखाद्या पित्याला जर जास्त मुली असतील,  तर अशा वेळी मात्र त्याच्या समोर गंभीर प्रश्न समोर उभा राहतो. एका मागून एक मुली लग्नाला येतात आणि मग त्या समाजाच्या डोळयांत सलत असतात. एकीकडे गरिबी आणि दुसरीकडे समाज, अश्या दुहेरी धर्मसंकटाच्या कचाट्यात तो सापडतो. मग त्याची जी ससेहोलपट चालू होते ती शीतल सारख्या एखाद्या निरागस मुलिचा शेवट करूनच संपते.

हुंडा देण्याघेण्याच्या ह्या हलकट प्रथेमुळंच समाजात स्त्री पुरुषांच्या जन्मदारांमध्ये कमालीची तफावत आढळून येते. मुलगा म्हणजे धनाचे (हुंड्याचे) कोठार आणि मुलगी म्हणजे गरिबीचे दार! हे समीकरणच या हुंड्यामुळे तयार झाले आहे. याच्या परिणाम होतो असा की, एकटा मुलगा असला तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे , पाच मुली झाल्या तरी चालतील पण वंशाचा दिवा हवा म्हणून सहाव्या आपत्याची (मुलाची) वाट पाहणारे बरेच जोडपे मी बघितले आहेत. मुलीच्या जन्मापासूनच तिचा बाप तिच्या हुंड्याच्या तयारीला लागतो. ह्या नीच चालीरीतीमधून शिक्षित मुलीही सुटल्या नाहीत. जेवढी वायानं मोठी ,जेवढी कमी देखणी मुलगी असेल तिला तेवढाच जास्त हुंडा लागतो. मुळात स्त्री पुरुष असमानतेला 'हुंडाच' हे महत्त्वाचं कारण आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळं अनेक कोवळ्या मुलींना जन्माआधीच संपवल्याचा दुष्कृत्य केले जाते. मुलींना गर्भातच मारण्याचे अक्षम्य पातक केले जाते. एखाद्या गरीब मुलीच्या  पित्यानं कर्ज काढून लग्न केलंच, तर तिला सासरमध्ये परत हुंड्यासाठीच छळलं जातं. यातून अनेक निरपराध मुलींचा बळी गेल्याच आपण नेहमीच बघतो, ऐकतो किंवा वाचतो.

एकीविसाव्या शतकात हे चित्र बदलणे गरजेचे आहे. शितलसारख्या अनेक मुलींना वाचवायचे असेल तर ह्या वाईट चालीलीरितींमध्ये बदल हा अपरिहार्य आहे. यासाठी तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन 'हुंडा घेणार नाही' असा निर्धार करायला हवा. तरुणींनीही हुंडा मागणाऱ्या मुलासोबत लग्न करायला नकार देण्याचं धाडस करायला हवं. समाजानेही हुंडा मागनाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत करून सामाजिक जबाबदारी निभवावी. खरं तर हे एवढं सोपं नाही आहे! कारण या प्रथांनी आपल्या समाजाला पोखरून पोखरून कमजोर केलं आहे. हा बदल स्वीकारायला वेळ लागेल, पण सुरुवात तर करायलाच हवि!

काही  तरुण तरुणी आजही आहेत, जे या प्रथेला उघडपणे विरोध करतात. आशा तरुणांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. हुंडा घेण्याची प्रथा ग्रामीण भागात जास्त असल्यामुळं तेथील लोकांचे वैचारिक प्रबोधनही तितकेच आवश्यक आहे. शिकलेल्या तरुणांनी जबाबदारी समजून हे करायला हवं. देशाचे तरुणचं आज देशाचे भविष्य बदलू शकतात. कायद्याने सुद्धा या अनिष्ट प्रथेला गुन्हाच मानलं आहे. मुलीचा जन्म आणि शिक्षणासाठी शासनाने सुद्धा विविध योजना सुरू केल्या आहेत. याची माहिती सुद्धा लोकांनी द्यायला हवी. "हुंडा घेणारच नाही"  असा नारा प्रत्येक तरुनाणे दिला, तर कोणत्याही पित्याला हुंडा द्यावा लागणार नाही. परिणामी अनेक मुलिंना त्या स्वतः पित्यासाठी आणि परिवारासाठी ओझे आहेत असा न्यूनगंड होणार नाही.

शेवटी हुंडा घेऊन लग्न करणाऱ्या मुलांबद्दल लिहतोय, जर हुंडा घेऊनच  लग्न करायचं असेल किंवा लग्न करून स्वतःच्या जिवावर बायकोला सांभाळन्याची कुवत नसेल तर लग्न करण्याचं धारिष्ट त्या  मूर्खानी करू नये!! कारण कोणत्याही मुलीचा हुंडाबळी घेण्याचा नैतिक आणि कायदेशीर असा कोणताचं अधिकार तुम्हाला नाही...!!

दैनिक गांवकरी , दैनिक लोकशा मध्ये  पूर्व प्रकाशित.

प्रेमकूमार शारदा ढगे (९८६०३०३२१६)
premkumar.dhage@gmail.com

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...