Wednesday, 1 June 2016

हो... प्रेम कराच...

बाबा पेट्रोल पंप ते मिल कॉर्नर पर्यंतच्या कोपऱ्यावर बरेच लोक फुटपाथवर पोटापाण्याचा काहीतरी उद्योग करताना बसलेले दिसतात. खारी, फुटाणे विकणारे, चहा टपरीवाले, कॉलेजच्या बॅग , शाळेचे दफ़्तर,  घड्या विकणारे, कपड्यावाले, आइसाक्रीमवाले आणि आणखीन बरेच जण. आपण सहसा यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. पण बरेच पोलीस , ट्रॅफिकवाले यांचे बरोबर लक्ष असते यांच्यावर. असो...

एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या जवळ आल्यानंतर फुटपाथला झाडाच्या सावलीला एक साठीच्या वयातील इसम बसलेला दिसला. पण त्याच्याकडं जास्त लक्ष न देता झपाझप पाऊले टाकत पुढे जात होतो. " अरे भैया इधर आओ जरा." पाठीमागून आवाज ऐकायला आला. मागे वळून बघितलं तर तो वृद्ध इसम मलाच आवाज देत होता. पण त्याला टाळून पुढे पाऊल टाकले. यावर तो ," बहुत जल्दी में दिख रहे हो भैया , जरा आओ इधरभी. तुम्हारे लिये तो ये सब दुकान खोलके बैठा हूँ मैं. "  समोर एका चटईवर टाकलेल्या वेगवेगळ्या वस्तूकडे बोट बोट दाखवत तो बोलला. चला म्हटलं ,काय आहे तर बघून घेऊ, आणि त्याच्या जवळ झाडाच्या सावलीला गेलो. समोर चटईवर लकडासारख्या काही साबुदाण्यासारख्या पांढऱ्या आणि लाल रंगाच्या , काही सुक्या बोंबील माश्यासारख्या वस्तू दिसत होत्या. त्या वस्तू बघून मला एक हलकासा प्राथमिक अंदाज आला कि हा कोणीतरी जडीबुटीवाला तांत्रिक बाबा दिसंत आहे.

"बोलो बाबा क्या  है ..?"  या प्रश्नाला उत्तर देताना ," बेटा क्या बात है , कुछ परेशान दिख रहे हो..? बाबाने संवादफेकी केली. "नही  बाबा वैसा कुछ नाही है..! " अस बोलल्यावर मात्र बाबा थेट मूळ विषयावर आले. " लागता है शादी नही हुई बेटा आपकी.?"  मी लगेच "नही"  उत्तरलो. बाबा लगेच बोलले, "यही तुम्हारी परेशनी की वजह है बेटा." बाबांनी लगेच कंक्लुजन देऊन टाकलं. बाबांनी परत प्रश्न केला, " कहाँ कालेज जा रहे हो बेटा.? कदाचित माझ्या पाठीवरची सैक बघून त्यांनी अंदाज काढला असावा. "हाँ" म्हटल्यानंतर बाबा लगेच सुरु झाले, "देखो बेटा, एक लडकी है जो तुम्हे बहुत चाहती करती है, लेकिन तुम कूछ बोलते नही इसीलिए वो चूप है."  अस बोलून बाबा मिश्किलपणे हसायला लागले. पांढरीशुभ्र दाढी, किरमिजे डोळे आणि समोरच्या दोन दातांमध्ये स्पस्ट दिसणारी फट असलेले बाबा वयाच्या साठीमध्ये असल्या चावट आणि फाजील गोष्टी व्यक्त करताना जराही शोभत नव्हते. पण बाबांच्या या वाक्याने जरी ते वाक्य शंभर टक्के खोटे आहे हे मला माहिती असताना सुद्धा काही प्रमाणातका होईना पण सुखावलो. आपण कुणालातरी आवडतो हे समजल्यानंतर कोणाताही सामान्य व्यक्ती अर्ध्या हळकुंडाने पिवळा नाही होणार तर नवलच..! असो...

इच्छा नसताना सुद्धा थोडा मूडमध्ये आलोच आणि बाबांची फिरकी घेण्याच्या हेतूने बोललो, " ऐसा थोडी होता है बाबा, कोई लाडकी भला मुझे क्यूँ  चाहेगी ? मुझमे ऐसी कोई खास बात नही है जिसकी वजहसे कोई लडकी मुझे पसंद करे..!"  बाबांचे उत्तर तयारच होते. " नही बेटा, एक लडकी है जो तुम्हे बहुत पसंद करती है , तुम्हारे पास नहि तो क्या हुआ , मेरे पास एक चीज है 'जगत मोहिनी मंत्र' से भरी हुई, एक बार इसे जेब मी रखोगे तो वो लड़की तुम्हारे पीछे आपणेआप चली आयेंगे." डोळे बारीक करत आणि कॉन्फिडंट भावमुद्रा करत बाबा बोलत होते. अगदी क्षणार्धात मला फँड्रीतील जब्याची अभिव्यक्ती आठवली . एका मुलीच्या अधांतरी प्रेमाच्या शोधात हा बिचारा पूर्ण चित्रपटात काळ्या शेपटीचा चिमणी मारण्यात स्वत:लाही विसरतो. आंधळ्या एकतर्फी प्रेमातून असले कितीतरी "फँड्री"  स्वात:च्या "शालूला" शोधत असतात. जगतमोहिनी मंत्राच्या निमित्तानेका का  होईना पण स्वतःला जब्या असल्याची फीलिंग स्पर्श करून गेली. हो तोच जब्या जो काळ्या चिमणीच्या राखेने शालूला मुग्ध करण्याचे स्वप्न पाहतो. तोच जब्या जो " व्हय र पीऱ्या मी शालूला आवडणं का र ?" असा प्रश्न विचारात स्वतःची औकात कमी असल्याच्या जाणिवेने मन मारणारा. तोच जब्या जो आपण दिसायला स्मार्ट नाहीत म्हणून नाकाला चिमटा लावून बसणारा. आई शाळेत आली तर शाळेत कशाला आलीस म्हणून आईवरच रागावणारा. सगळ्यांना आवडणार पण शालूपर्यंत कधीही न पोचलेले प्रेमपत्र लिहणारा. शालूच्या एका दृष्टीक्षेपासाठी तिच्या मागे मागे लपून फिरणारा जब्या. शालूवर जीवपार प्रेम करणारा पण केवळ जातीचे आणि गरिबीचे चटके सोसणाऱ्या जब्या. फ्लॅशबॅक मधून बाहेर येत , मी लगेच स्वत:ला सावरलं .आता मला कळालं , बाबांची जास्त फिरकी घेण्यात काही अर्थ नाही , बाबाच्या जास्त नादाला लागलं तर बाबा आपलीच फिरकी घेतील. " ठीक है बाबा मेरे बहुत सारे दोस्त है, आते वक्त मैं उनको साथमें लेके आता हूँ"  अस बोलून तिथून शेवटी पळ काढला.

रस्त्यानं चालत असताना एक विचार सारखा मनात घोळत होता, कोणत्यातरी मुलीच्या प्रेमासाठी आपण हे सगळं करतोय का..? आतापर्यंतच्या आयुष्यामधली चालत आलेली तगमग, इंजिनीरिंग करण्याचा उपद्व्याप , त्याच्यानंतर जॉब मिळवण्यासाठीची धडपड , समाजामध्ये स्वत:च मेन्टेन केलेलं सामाजीक स्टेटस हे सगळं आपण एखाद्या मुलीच प्रेम मिळवण्यासाठी करतोय का..? मुळात एखाद्या मुलीनं आपल्यावरच काय म्हणून प्रेम करावं ? आपण इतरांवर का प्रेम करू नये..? एखाद्या मुलान अमुक एखाद्या मुलीवर आणि अमुक एखाद्या मुलीनं तमुक एखाद्या मुलावर प्रेम करावं... हे अस का.?

एखाद्या मुलाला प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादी मुलगीच कशाला पाहिजे ..! आरे आपल्या जन्माच्या आगोदर पासून आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे आपले आईवडील यांच्यावर का प्रेम करू नये.? लहानपणापासून आपल्या सोबत असणारा आपला बालमित्र ,तो या प्रेमाचा हक्कदार नाही का..? सांगितलेले प्रत्येक काम करणारा आणि हक्काने काम सांगणारा मोठा भाऊ किंवा बहीण नाहीत का या प्रेमाचे वाटेकरी..? आपल्या लहानपणापासून ते अगदी डॉक्टरेट पदवी मिळेपर्यंत लाभलेले गुरुजन यांच्यावर का प्रेम करू नये ? निंदा करणारे आणि आपल्याला नेहेमी कमी दाखवरे लोकं पण ज्यांच्यामुळ जगण्याची आणि काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा सतत भेटले अश्या दुश्मनांवर का प्रेम करू नये..?

यांच्याही पुढे जाऊन असे म्हणेन, कि कुणीतरी आपल्यावर प्रेम करण्याची वाटच बघू नका. बिंधास स्वछंद आणि बेलगामपणे तुमच्याकडचे प्रेम हे इतरांवर उधळत चला. आणि प्रेम ही भावना अशी आहे जी इतरांवर खर्च केल्याने कधी कमी होत नाही. करा... सगळ्यावर्ती बेछूट प्रेम करा. आपल्या देशात प्रेम करण्यार्यांवर टॅक्स घेत नाहीत. तेंव्हा प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करा. सकाळी सकळी घरटे सोडलेल्या आणि आन्नासाठी वणवण भटकणाऱ्या पक्षावर प्रेम करा. कडक उन्हाळ्यात आपल्या सावलीने प्रत्येकाला आसरा देणाऱ्या झाडावर प्रेम करा. जन्मभर साथ निभावणाऱ्या इमानदार कुत्र्यावर, गाईवर, बैलावर , शेतावर , निसर्गाची ही हजारो रुपे आहेत या सर्वांवर प्रेम करून पहा. प्रेमाची एक वेगळीच अनुभूती अनुभवायला मिळेल.

फक्त एखाद्या मुलावर किंवा मुलीवर वेड्यासारखे "सैराट" प्रेम करणात काही अर्थ आणि काही शहाणपणा नाही. (सैराट वर वेगळा लेख टाकणार आहेच) अब्दुल कलाम, ए. बी. वाजपेयी, आण्णा हजारे , असे बरेच उदाहरण देता येतील ज्यांनी स्त्रियांच्या शिवाय आयुष्यमध्ये उत्तुंग भरारी घेतली. मायावती, लता मंगेशकर, मदर तेरेसा अशा अनेक स्त्रियांची उदाहरणें देता येतील ज्या पुरुषी प्रेमाविना जगात यशश्वी बनल्या.

लेख लेहण्याचं उद्देश तुम्हाला प्रेम नका करू हे सांगणे नसून उलट प्रेम करा हे सांगणे आहे . फक्त एखाद्या मुलीवरच किंवा मुलावरच मर्यादित प्रेम करू नका . प्रत्येक चांगल्या गोष्टीवर , व्यक्तीवर , तिच्या चांगल्या गुणांवर, आदर्शवर आणि विचारावर प्रेम करा.  एखादी मुलगी किंवा मुलगा आवडत असेल तर तिच्यावर एकतर्फी सुद्धा प्रेम करा..! फक्त अट एवढीच की ते प्रेम तेवढेच सुरक्षित ,निर्भेळ , आणि निरागस वाटले पाहिजे समोरच्या व्यक्तीला. पुरुषी मर्यादा आणि स्त्रियांच्या आत्मसम्मान न डावलता एक तर्फी प्रेम करायला जाहिच हरकत नाही . सुरुवातीपासूनच सांगत आहे की, प्रेम हे आहेच इतरांना वाटण्यासाठी. तुमच्याजवळच निस्वार्थ प्रेम सगळ्यांवर उधळत रहा. तुम्हाला  तुमच्यावर कोणीतरी प्रेम करावे याची गरजच वाटणार नाही ...आणि मग बघा ....जग किती प्रेमळ आहे .....

प्रेमकुमार शारदा ढगे
premkumar.dhage@gmail.com

premkumardhage.blogspot.com

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...