Saturday, 26 August 2017

पावित्र्य आणि पाखंड....


बाबाची आज सुनावणी होणार असते. त्याचं जे घोंगडं पंधरा वर्षापासून भिजत पडलं होतं त्याचा आज निकाल लागणार असतो. म्हणून दोन तीन दिवसापासूनच बाबाचे भक्त कोर्टाकडे चकरा मारायला लागतात. सगळीकडे एक अस्वस्थता पसरलेली असते. कारण काय होणार हे कुणालाही माहिती नसतं. तशी कोर्टामध्ये जाण्याची बाबाची ही काही पहिली वेळ नाही पण आज जरा वेगळंच वातावरण तयार झालं होतं. शेवटी बाबा कोर्टाकडे रवाना होतात. जवळपास सातआठशे गाड्यांच्या ताफ्यासोबत बाबा शक्तिप्रदर्शन करत प्रस्थान करतात. शेवटी न्यायालय बाबांना दोषी ठरवतं आणि निकाल राखून ठेवतं. मग काय हाहा म्हणता कोर्टाबाहेर जमलेले बाबांचे भक्तगण सगळीकडे जाळपोळ करतात. आणि याचं पर्यावसान दंगली मध्ये होतं. या दंगलीत जवळपास २५-३० जण आपला जीव गमावून बसतात. प्रशासन हतबल होऊन जातं. सगळी परिस्थिती हाताबाहेर निघून जाते.

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी हि कथा कुणाची आहे हे लक्षात आलं असेलच. हो अगदी बरोबर! गुरमित राम रहीम सिंग. हिंदु मुस्लिम आणि शीख आशा तीन्ही धर्मांचा प्रतिनिधी असलेला हा बाबा. उत्तर भारतात प्रसिद्ध असलेला हा बाबा. 'डेरा सच्चा सौदा' नावाचा त्याचा प्रसिद्ध मठ. हा बाबा तसा देवाचा भक्तच. या भक्ताच्या मठात शेकडो तरुण स्त्रिया याच्या सेवेसाठी. आणि याच स्त्रियांचं तिथे भक्तीच्या नावाखाली  लैंगिक शोषण व्हायचं. हा देवभक्त एक उत्तम गायक, आणि अभिनेता सुद्धा आहे!  तेथील एका महिला शिष्याने २००२ साली त्याच्या हा कुकर्मांची कहाणी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लेखी निनावी पत्राद्वारे कळवली होती आणि तिथून पुढे ह्या नकली बाबाचे बिंग फुटले. देशाला असल्या अनेक बाबांची (नकली बाबांची) सवयच झाली आहे. यामध्ये आसाराम बापू, स्वामी नित्यानंद बाबा, रामपाल बाबा,  असल्या अनेक नकली देवभक्तांची नावे घेता येतील.

तब्बल पंधरा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या खटल्याची सुनावणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी पूर्ण झाली. याबाबतची शिक्षा न्यायालयाने राखून ठेवली आहे. न्यायालयाने या गुरूला दोषी ठरवतात न्यायालयाबाहेर हिंसाचाराचे सावट पसरले. बाबा समर्थक भक्त लोकं आणि पोलीस, निमलष्करी,लष्करी दले यांच्यातील धुमश्चक्रीत २०-३० जण ठार झाले.

या घटनेनंतर अनाहूतपणे मला आठवण झाली ती निर्भयाच्या घटनेचे. कारण दोन्ही घटना ह्या बलात्काराशी निगडित होत्या. फरक एवढाच होता की निर्भया प्रकरणामध्ये तरुणाईने सरकारला हादरून सोडले होते एका निरपराध मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी. बलात्कारी पुरुषांना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी. पण रामराहिम सिंग संदर्भात मात्र त्याला कोर्टाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. असे असताना सुद्धा त्याच्या समर्थानात लाखों लोकं सरकार विरोधात निदर्शने करतात हे आपल्या विकृत आणि ढासाळलेल्या मनोवृत्तीचे दर्शकच आहे. आज आपण एका बलात्कारी पुरुषाला वाचवण्यासाठी सरकारच्या विरोधात, न्यायालयाच्या विरोधात हिंसा करतोय म्हणजे आपला देश नेमका कुठे चाललाय याचं आत्मपरीक्षण व्हायला हवं. स्त्रीला देवीचा दर्जा देऊन तिची पूजा करणाऱ्या भारतात आज तिच्या अभ्रूचे लक्तरे निर्लज्जपणे वेशीला टांगणाऱ्याला आपण वाचवण्याचा आटापिटा करतोय. हीच का आपली संस्कृती? आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचं समर्थन करतोय याच यत्किंचितही भान नसावं का बरं या तरुणाईला..? खरोखरच आपण मार्ग तर नाही ना भटकलो.? बलात्कारी व्यक्तीला अभय देऊन आपण समाजामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा अपमान नाही का करत?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि त्यातून तरुणाईने योग्य तो मार्ग स्वीकारला तरच आपला देश हा स्त्रीयासंबंधीत शुभचिंतक आणि सक्षमीकरणाकडे घेऊन जाणारा ठरेल. स्त्रियांच्या आत्मसमान,अभ्रू आणि संरक्षणासाठी कुठेही तडजोड केल्या जाऊ नये हाच खरा स्त्रियांचा सन्मान होय. लोकांनी स्वतःची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून योग्य आणि नकली देवभक्तांची पारख ठेवावी. आगोदरच भारतासारख्या धर्मभोळ्या लोकांचा फायदा घेणारे अनेक महाभाग या देशाचा फायदा घेऊन गेले. ढोंगी आणि विवेकी धर्मगुरुंमधला फरक जनतेने ओळखला पाहिजे. पावित्र्य आणि पाखंड यामधला फरक ओळखला पाहिजे. नाहीतर असले ढोंगी आणि कपटी बाबा आपल्याला मिळतच राहतील आणि धर्माच्या आणि देवाच्या नावावर आपली लूट आणि फसवणूक होतच राहील.

दैनिक केसरी मध्ये पुर्वप्रकाशीत (२७ ऑगस्ट, रविवार)

प्रेमकुमार शारदा ढगे

Friday, 11 August 2017

स्त्रियांचं एकेविसाव शतक.

एकेविसावं शतक हे स्त्रियांचं आहे असं म्हणतात. कारण या युगात असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुढं आलेल्या आहेत. शिक्षकांपासून ते देशाच्या  सीमेच्या संरक्षणाची धुरा आजकाल स्त्रिया सांभाळत आहेत. आणि ही अगदीच अभिमानाची गोष्ट आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं पुढं असंन म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारकांच्या प्रयत्नांचे फलित आहे. राजा राममोहन राय, लोकहितवादी, न्या. रानडे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.आंबेडकर ,महात्मा गांधी अशा अनेक समाजसुधारकांची नावे घेता येतील. प्राचीन भारताच्या तुलनेत आजचा झालेला हा बदल म्हणजे आज विजयाचा सुवर्ण सोहळाच म्हणावा लागेल.

जरी आज या सगळ्या गोष्टी अभिनंदनास पात्र असल्या तरी काही प्रतिगामी ,रुढीवादी लोकांना ही गोष्ट पटत नाही. प्रत्येक ठिकाणी पुढे असलेला स्त्रियांचा सहभाग त्यांना नेहमीच खटकतो. मग अशावेळी जणीवपूर्वक स्त्रियांना त्यांचा आत्मविश्वास कमी होईल अशी वागणूक दिली जाते. सार्वजनिक जीवनात त्यांना कमी लेखनाचा प्रयत्न केला जातो. त्यांची मानसिक पिळवणूक केली जाते. अशातूनच भर म्हणून एखाद्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्या आपण सर्रास ऐकत असतो. त्यांच्या चारित्र्याचा हलकल्लोळ करून त्यांना बदनाम केले जाते. त्यांच्या वयक्तिक आणि सामाजीक आयुष्याची धूळधाण केली जाते.

महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर महिलांच्या तस्करीमध्ये महाराष्ट्र हा देशात दोन नंबरला पोचला आहे. ही खरोखर पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची गोष्ट आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या विजया राहटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मागच्या वर्षी तस्करीच्या घटनांमध्ये २३ टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली होती. यामध्ये जास्तीत जास्त स्त्रिया ह्या वेश्याव्यवसायमध्ये जबरदस्तीने फेकल्या गेल्या.

सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सुद्धा खूपच ऐरणीवर आला आहे. नुकतेच घडलेल्या दिल्लीच्या प्रकरणामध्ये एका आय.ए.एस.अधिकाऱ्याच्या मुलीला छेडण्याचा प्रकार समोर आला. एका अधिकाऱ्याच्या मुलीला कोणीतरी राजकीय पुढाऱ्याचा मुलगा छेडतो आणि त्याला राजकीय ताकद वापरून अभय दिले जाते ही महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि अगदी अपेक्षेप्रमाणे या घटनेचा सर्व समाजमाध्यमातून निषेध झाला. जिथे  प्रथम श्रेणी अधिकाऱ्याची मुलगी सुरक्षित राहू शकत नाही तिथे सर्वसामान्य मुलीची काय शाश्वती आहे? आणि म्हणूनच की काय आपला भारत देशात  दररोज ९० बलात्कार होतात (२०१४ च्या क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या सांख्यिकी नुसार.सध्या हे प्रमाण कमी जास्त असू शकते)

केंद्र पातळीवरून सुद्धा महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली जाते. महिलांना समान वागणूक व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यांच्यासाठी खास "सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ बेटी पाढाओ, उज्वला, नारी शक्ती पुरस्कार" अशा विविध योजना आणल्या आहेत. नुकतीच मोदी साहेबांनी मुस्लिम स्त्रियांसाठी "शादी शगुन" योजना आणली आहे ज्यामध्ये पदवी प्राप्त मुस्लिम स्त्रियांना ५१००० हजार शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. ही नक्कीच स्वागतहार्य बाब आहे.

पण परत  एकदा स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून  मासिक पाळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडवर १२% जी.एस.टी. लावून अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे. यामुळे या सॅनिटरी पॅडची किंमत काही रुपयांनी वाढली आहे. परिणामी सर्वसामान्य गरीब स्त्रिया ते पूर्वीसारखं विकत घेऊ शकणार नाहीत. शिवाय , राजकीय दृष्टीकोनातूनही शासनास हे परवडणारे नाही आहे. समस्त महिला वर्गाची आणि त्यांना समर्थन करणाऱ्या स्त्रीवादी  पुरुष वर्गाची नाराजी ओढवून घेणे सरकारला पेलणार नाही. लवकरच शासन यासंदर्भात योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा करूयात.

दैनिक केसरी मध्ये पूर्वप्रकाशीत (१३ ऑगस्ट २०१७)

प्रेमकुमार शारदा ढगे, बजाजनगर औरंगाबाद
(९८६०३०३२१६)

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...