Friday, 28 April 2017

ईडा पीडा जळो

अर्ध्या तासापूर्वी एका पत्रकार मित्राने मानवत रोड येथे शेतकऱ्याने केलेल्या  आत्महत्येची बातमी शेअर केली.अत्यंत कडक उन्हात गर्द चिंचेच्या झालाखाली तो शेतकरी शांत विसावल्याचं चित्र पाहून अंगावर काटा उभा राहिला.

शेतकरी आणि शेतकऱ्यांचा आत्महत्या हा बघायला घेलं तर  अत्यंत कळीचा आणि संवेदनशील मुद्दा. परंतु ह्या संवेदनशील मुद्द्याला  प्रत्येकजण हवे तसा वापरतो. शेती व्यवसाय हा एक मोठा जुगार आहे , असं म्हणतात ते काही खोटं नाही. पावसाची खात्री नाही, पेरलेल्या बियानांच्या , खतांच्या प्रतीची खात्री नाही, उत्पादित मालाच्या हमी भावाची खात्री नाही. अश्या प्रकारे सर्व काही अशाश्वत असताना शेतकरी निसर्गसोबत आयुष्याचा जुगारच खेळत असतो. प्रस्थापित सरकार मात्र रिंग मास्टर सारखं फक्त चाबूक घेऊन त्यांना हवे तसे झुलवत असतात.

मागच्या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यातच ११६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती समोर आली. वर्षाच्या सुरुवातीलाच दिसणारी ही आकडेवारी खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयीच्या गंभीर्याबद्दल सूचकच होती. पण ही आकडेवारी जसे जसे वर्ष संपत गेले तशी अजूनच वाढतच गेली.पहिल्या तीन महिन्यातच शेतकऱ्यांनी आत्महत्या करत महाराष्ट्राला  देशात अव्वल स्थानावर आणले होते. ११६ पैकी ५७ शेतकरी हे केवळ महाराष्ट्रातील होते.

ही परिस्थिती केवळ महाराष्ट्र राज्यातच आहे असे काही नाही. प्रत्येक राज्याचे कमी जास्त प्रमाणात हेच आकडे आहेत. शेतकरी आत्महत्या ही केवळ एका राज्याची समस्या नसून ती संपूर्ण देशाची समस्या झाली आहे. शेतकरी आत्महत्या का करतात हा संशोधनाचा विषय आहे. आणि यावर संशोधन व्ह्यालाच हवं. शेतकऱ्यांची नेमकी दुःख काय आहेत ? कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतात? अशी कोणती समस्या आहे की हा जगाचा पोशिंदा स्वतःला संपवुन घेण्याचा आत्मघातकी निर्णय घेतो, याचा योग्य तो अभ्यास आणि त्यावर उपयोजना प्रस्थापित शासनाने करणे जरुरी आहे.

शेतकरी आत्महत्येला पूर्णतः जरी नसले तरी जास्त प्रमाणात शासनाचे शेतीविषयक धोरण जबाबदार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शेतकऱ्याला कमी व्याजदराने कर्ज, परत फेडीसाठी मुभा, कमी दरात वीज पुरवठा , बी बियाणे , योग्य आणि मापक दरात खते,  फवारणीसाठीची किटकनाशके  उत्पादित मालाला योग्य हमी भाव , यांची सोय शासनाने वयक्तिक लक्ष देऊन करायला हवी तरच शेतकरी जगेल.

परंतु हल्ली शेतकऱ्याच्या समस्येबद्दल उदासीन आणि असंवेदनशील  धोरण राबवले जात आहे. शेतकरी त्याच्या मागण्या शासन दरबारी
मांडून देखील त्यांची प्रतारणा होत आहे. ताजे उदाहरण म्हणजे तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी संतापातून स्वतःचे मूत्र पिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाला बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करायला काहीही हरकत नाही. शेतकऱ्याला कर्ज माफी द्याची म्हटली की बँकेचे पतधोरण समोर आनले जाते. देशात गाईला वाचवले जाते पण गाईचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र गळ्याचा  फास जवळ करावा लागतो.

देशात शेतकरी जगला तर सगळे सुखाने जगू शकतील. मरण पावलेल्या शेतकऱ्याच्या नंतर त्याच्या कुटुंबाचा बॅलन्स बिघडतो. मुलाचे शिक्षण , मुलींचे लग्न आई वडीलांचा सांभाळ असे गंभीर प्रश्न आ वासून पुढे उभे राहतात. असेच राहिले तर भविष्यात कोणीही शेतकरी बाप त्याच्या मुलाला शेती करू देणार नाही. आणि भारत देश हा कृषी प्रधान देश आहे हे विसरून जावे लागेल. शेवटी ," ईडा पीडा जळो आणि बळीचं राज्य येवो" हीच निसर्गाकडे आणि मायबाप शासनाकडे प्रार्थना.

प्रेमकुमार शारदा ढगे, औरंगाबाद
(९८६०३०३२१६)
साप्ताहिक लोकसंकेत मध्ये पूर्वप्रकाशीत

Saturday, 15 April 2017

पुन्हा शीतल नको!

आज पुन्हा एकदा पुरोगामीत्वाला आणि आधुनिकतेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली. लातूर मधील शीतल वायाळ या एकवीस वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण काय असेल तर , स्वतःला संपवून बापाच्या डोक्यावरील हुंड्याचं ओझं कमी करणे! शेतकरी असलेल्या बापाच्या मुलीचं शेवटचं पत्र, हे अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच संवेदनशील व्यक्तीच्या छाताडात घुसून काळीज पिळून टाकणारं आहे. सततच्या दुष्काळ आणि गरिबीमुळं सलग पाच वर्षे शीतलचं लग्न पुढे ढकलल्या जात होतं.शेवटी बापाची होणारी धावपळ आणि कारूणिक स्थिती तिला न सहन झाल्यामुळे,  नैराश्यातून तिने आत्महत्या केली. एक स्त्रीवादी व्यक्ती असल्यामुळे मी स्वतःला हा लेख लिहण्यापासून थांबवू शकलो नाही. गरिबी , दुष्काळ,  शेतकी कर्ज वगैरे ह्या राजकीय बाबी थोड्या बाजूला ठेऊन थोडं नैतिक मुद्यांवर मला बोलायला आवडेल.

नेहमीच पुरोगामी समजला जाणारा भारत देश आणि त्यातही महाराष्ट म्हणजे सगळ्यात आधुनिक, तसेच जवळपास, सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक, आर्थिक अशा सगळ्याच चळवळींचा प्रदेश. ह्याच महाराष्ट्रातून देशाला पहिली महिला राष्ट्रपती मिळाली. याच महाराष्ट्रातून अखंड देशातील स्त्रियांना शिक्षणाचा आणि आत्मउन्नत्तीचा मार्ग दाखवणारी भारतातील पहिला महिला शिक्षिका मिळाली. असली अनेक उदाहरणे देता येतील, महाराष्ट्रातील आधुनिक स्त्रियांच्या उच्चतम दर्जा बद्दल. पण आजही या पुरोगामी महाराष्ट्राला हुंड्याची प्रथा ही वाळवी लागल्याप्रमाणे आतून पोखरत चालली आहे! देशातल्या अनेक प्रथा ज्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेची मानहानी करणाऱ्या होत्या त्या काळानुरूप बंद झाल्या. सतीप्रथा, विधवांचे केशवपन, जरठकुमारी विवाह अशी अनेक उदाहरणे आहेत.

समाजाने अनेक जुन्या परंपरा मोडीत काढत आधुनिक परंपरा आत्मसात केल्या, पण लग्नामध्ये मुलीच्या बापाकडून पैसे किंवा दागिन्यांच्या स्वरूपात हुंडा घेण्याच्या प्रथेला अबोल दुजोरा आजही  दिला जातो. कारण यामध्ये मुलीच्या बापाकडून येणारा पैसा हा भावी दाम्पत्याच्या पुढील आयुष्यात वापरला जातो. ह्या हुंड्याच्या प्रथेमध्ये मुलीच्या बापाणेही कधी काळी एका  मुलीच्या बापाकडून हुंडा घेतलेला असतो, त्यामुळे तो ती प्रथा तशीच वारसा रूपाने पुढच्या पिढीच्या मस्तकी आदळतो. अशा प्रकारे ही प्रथा पिढी दर पिढी पुढे चालत आली आहे.

एखाद्या पित्याला जर जास्त मुली असतील,  तर अशा वेळी मात्र त्याच्या समोर गंभीर प्रश्न समोर उभा राहतो. एका मागून एक मुली लग्नाला येतात आणि मग त्या समाजाच्या डोळयांत सलत असतात. एकीकडे गरिबी आणि दुसरीकडे समाज, अश्या दुहेरी धर्मसंकटाच्या कचाट्यात तो सापडतो. मग त्याची जी ससेहोलपट चालू होते ती शीतल सारख्या एखाद्या निरागस मुलिचा शेवट करूनच संपते.

हुंडा देण्याघेण्याच्या ह्या हलकट प्रथेमुळंच समाजात स्त्री पुरुषांच्या जन्मदारांमध्ये कमालीची तफावत आढळून येते. मुलगा म्हणजे धनाचे (हुंड्याचे) कोठार आणि मुलगी म्हणजे गरिबीचे दार! हे समीकरणच या हुंड्यामुळे तयार झाले आहे. याच्या परिणाम होतो असा की, एकटा मुलगा असला तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे , पाच मुली झाल्या तरी चालतील पण वंशाचा दिवा हवा म्हणून सहाव्या आपत्याची (मुलाची) वाट पाहणारे बरेच जोडपे मी बघितले आहेत. मुलीच्या जन्मापासूनच तिचा बाप तिच्या हुंड्याच्या तयारीला लागतो. ह्या नीच चालीरीतीमधून शिक्षित मुलीही सुटल्या नाहीत. जेवढी वायानं मोठी ,जेवढी कमी देखणी मुलगी असेल तिला तेवढाच जास्त हुंडा लागतो. मुळात स्त्री पुरुष असमानतेला 'हुंडाच' हे महत्त्वाचं कारण आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळं अनेक कोवळ्या मुलींना जन्माआधीच संपवल्याचा दुष्कृत्य केले जाते. मुलींना गर्भातच मारण्याचे अक्षम्य पातक केले जाते. एखाद्या गरीब मुलीच्या  पित्यानं कर्ज काढून लग्न केलंच, तर तिला सासरमध्ये परत हुंड्यासाठीच छळलं जातं. यातून अनेक निरपराध मुलींचा बळी गेल्याच आपण नेहमीच बघतो, ऐकतो किंवा वाचतो.

एकीविसाव्या शतकात हे चित्र बदलणे गरजेचे आहे. शितलसारख्या अनेक मुलींना वाचवायचे असेल तर ह्या वाईट चालीलीरितींमध्ये बदल हा अपरिहार्य आहे. यासाठी तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन 'हुंडा घेणार नाही' असा निर्धार करायला हवा. तरुणींनीही हुंडा मागणाऱ्या मुलासोबत लग्न करायला नकार देण्याचं धाडस करायला हवं. समाजानेही हुंडा मागनाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत करून सामाजिक जबाबदारी निभवावी. खरं तर हे एवढं सोपं नाही आहे! कारण या प्रथांनी आपल्या समाजाला पोखरून पोखरून कमजोर केलं आहे. हा बदल स्वीकारायला वेळ लागेल, पण सुरुवात तर करायलाच हवि!

काही  तरुण तरुणी आजही आहेत, जे या प्रथेला उघडपणे विरोध करतात. आशा तरुणांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. हुंडा घेण्याची प्रथा ग्रामीण भागात जास्त असल्यामुळं तेथील लोकांचे वैचारिक प्रबोधनही तितकेच आवश्यक आहे. शिकलेल्या तरुणांनी जबाबदारी समजून हे करायला हवं. देशाचे तरुणचं आज देशाचे भविष्य बदलू शकतात. कायद्याने सुद्धा या अनिष्ट प्रथेला गुन्हाच मानलं आहे. मुलीचा जन्म आणि शिक्षणासाठी शासनाने सुद्धा विविध योजना सुरू केल्या आहेत. याची माहिती सुद्धा लोकांनी द्यायला हवी. "हुंडा घेणारच नाही"  असा नारा प्रत्येक तरुनाणे दिला, तर कोणत्याही पित्याला हुंडा द्यावा लागणार नाही. परिणामी अनेक मुलिंना त्या स्वतः पित्यासाठी आणि परिवारासाठी ओझे आहेत असा न्यूनगंड होणार नाही.

शेवटी हुंडा घेऊन लग्न करणाऱ्या मुलांबद्दल लिहतोय, जर हुंडा घेऊनच  लग्न करायचं असेल किंवा लग्न करून स्वतःच्या जिवावर बायकोला सांभाळन्याची कुवत नसेल तर लग्न करण्याचं धारिष्ट त्या  मूर्खानी करू नये!! कारण कोणत्याही मुलीचा हुंडाबळी घेण्याचा नैतिक आणि कायदेशीर असा कोणताचं अधिकार तुम्हाला नाही...!!

दैनिक गांवकरी , दैनिक लोकशा मध्ये  पूर्व प्रकाशित.

प्रेमकूमार शारदा ढगे (९८६०३०३२१६)
premkumar.dhage@gmail.com

Monday, 10 April 2017

बाबासाहेब एका पर्वाची सुरवात आणि सद्यस्थिती..

जगात झाली फिक्स भिम जयंती १२६ म्हणत बाबासाहेबांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती आली. या निमित्ताने हा लेख प्रपंच! लेखणीचा सम्राट असलेल्या  व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेण्याचं धाडस माझी भाबडी लेखणी करते आहे. बाबासाहेब तसे एका लेखात किंवा एखाद्या ग्रंथात बंदिस्त होणारं व्यक्तिमत्व नाहीच आहे.

जयंती म्हणजे  बाबसाहेबांचे सच्चे अनुयायी असणाऱ्यांना तर  वर्षातून एकदाच येणारी सुवर्ण पर्वणीच. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच जयंतीच्या कमिट्या आणि त्यांचे अध्यक्ष यांचा बोलबाला चालू होतो. जयंतीची पट्टी मागण्यापासून ते डीजे वर नाचण्यापर्यंत सगळ्या गोष्टींना सुव्यवस्थित नियोजन लागतं! मग बाबांच्या जयंतीच्या नावाखाली सगळा धसमुसळेपणा, मोडलेला कायदे, भले मग तो बाबासाहेबांनीच का लिहलेला असेना,  माफ असतात आम्हा भीमसैनिकांना. आणि का नसू नये जयंती थोडेच वारंवार होत असते!

14 एप्रिलचा सूर्य  अखंड भारत विश्वाला बदलन्यासाठीच उजाडला. रामजी आणि भिमाई दाम्पत्याच्या नशिबाला चौदावा रत्न भीमाचा जन्म झाला. पुढे हाच भीमराव सगळ्यांचे साहेब, बाबासाहेब होईन हे कदाचित त्या वेळेच्या कर्मठ काळालाही माहिती नसावं. स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ म्हणजे सामाजिक बदलाच्या दृष्टीने फार महत्वाचा होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांनी देदीप्यमान असं शैक्षणिक यश मिळवलं होते. त्याकाळात त्यांच्या येवढ्या पदव्या मिळवणारा व्यक्ती त्यावेळेसही नव्हता आणि आताही कदाचितच असेल.

बाबासाहेबांच्या  संघर्षमय आयुष्यातील त्यांची सगळ्यात मोठी कमाई काय असेल, तर ते म्हणजे भारत देशाचं संविधान! हे संविधान बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून तब्बल दोन वर्ष , आकरा महिने आणि सतरा दिवसांत पूर्ण केले. संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठे लिखित संविधान म्हणून आपल्या संविधानाची  प्रशंसा केली जाते. लोकशाहीची मूलतत्त्वे असलेल्या समता , स्वातंत्र्य ,बंधुता, या त्रिमूल्यांचे समतोल सुसूत्रीकरण आपल्या संविधानामध्ये ओतप्रोत झालेले दिसते. खरं तर संविधान इतर देशांपेक्षा वेगळं असण्याची आजूनही बरीच कारणे आहेत.

मूळ ३९५ कलम असलेले संविधान हे २६ जानेवारी १९५० रोजी देशाने स्वीकारले. संविधानाच्या प्रस्ताविकेमध्येच संपूर्ण  संविधानाचा सारांश पाहायला मिळतो.  बाबासाहेबांनी सामाजिक न्यायच्या माध्यमातून समाजातील सर्व गरीब आणि मागास वर्गाला मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली आहे. प्रत्येक राज्याला शासन व्यवस्थेत सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती मार्गदर्शक तत्वे चौथ्या परिशिष्टात समाविष्ट केलेली आहेत. भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली असल्याने, या पद्धतीत देशाच्या सत्तेचे नियंत्रण फक्त एकाच व्यक्ती किंवा संस्थेच्या हाती नसने हे खूप महत्वाचे प्रयोजन आहे. देशाचे कायदे करण्याचा अधिकार जरी संसदेला असला तरी या कायद्यांचे योग्य अर्थ लावण्याचा व ते संवैधानिक असल्याचा पाठपुरावा करण्याचा मौलिक अधिकार हा सन्माननीय न्यायालयांना आहे. न्यायालयीन पुनर्विलोकणाचा अधिकार (मूलभूत अधिकारांवर गदा आल्यास न्यायालयाला जाब विचारण्याचा अधिकार) तर या दृष्टीकोनातून जनसामान्यांचे मोठे हत्यारचं म्हणावं लागेल. देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना संविधानाचा आत्मा म्हटल्या गेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, जीविताचे स्वातंत्र्य संरक्षण आणि लिंगभेद व जातीभेदाचे उच्चाटन हे मूलभूत अधिकारांमध्येच केले गेले आहे. स्त्रियांचे सरंक्षण आणि सक्षमीकरणासाठी सुद्धा संविधानामध्ये विशेष तरतुदी आहेत. संविधानाची निर्मिती करतेवेळेस बाबासाहेबांनी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास केला होता. तसेच अनेक दशांनी त्यांच्या संविधान निर्मितीत आपल्या देशाच्या संविधानचा आधार घेतला आहे. आशा प्रकारे एक ना अनेक वैशिष्टयांमुळे आपल्या देशाचे संविधान हे विशिष्ट ठरते.

बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत असताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करणे आगत्याचे ठरते. स्वतंत्र भारताचे पाहिले कायदामंत्री असल्या बहुमान त्यांनाच मिळतो. संपूर्ण कारकिर्दीत कायदा मांत्रालय , मजूर मंत्रालय , सर्वजनिक  बांधकाम मंत्रालय असे विविध क्षेत्र त्यांनी लीलया गाजवले आहेत. मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, अशा विविध नियतकालिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आपले निर्भीड आणि मुक्त विचार ते या वृत्तपत्रातून व्यक्त करत. प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, हू वेअर द शूद्राज, बुद्ध आणि त्याचा धम्म अशा विविध ग्रंथांचे लेखनही केले. बाबासाहेब आयुष्यभर विद्यार्थी होते. विद्यार्थी दशतेत असताना त्यांनी  कोलंबिया विद्यापीठात आठ वर्षाचा अभ्यासकाम अडीच वर्षात पूर्ण केला त्यासाठी त्यांनी दिवसाचे अठरा तास अभ्यास केल्याची नोंद आहे. उत्तुंग अर्थशास्त्रज्ञ , कायदे पंडित, मानववंश शास्त्रज्ञ , असली कित्येक विशेषणं त्यांच्या  बाबतीत वापरली जातात. जगातील सर्वांत विद्वान लोकांमध्ये त्यांचे नाव भारत देशातून अग्रस्थानी आहे.

बाबासाहेबांच्या चळवळीच्या सध्य परिस्थितीचा ऊहापोह केल्याशिवाय हा लेख पूर्णच होणार नाही. आंबेडकरी चळवळीचे बाबसाहेबांच्या  नंतर मात्र तीन तेरा वाजले. प्रयत्नांची पराकाष्टा करत बाबासाहेबांनी ओढत आणलेला क्रांती रथ त्यांच्या अनुयायांना पुढे खेचता नाही आला . त्यांच्या भारतीय रिपब्लिक पक्षाचे अक्षरशः तुकडे झाले. एकेकाळी विरोधी पक्षाची भूमिका गाजवणारा हा पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सगळ्यात वाईट परिस्थिती आहे ती या चळवळीत काम करणाऱ्या  तरुण आणि स्वभामिनी  युवकाची. कारण त्यांचे तथाकथित नेते हे स्वार्थापोटी आंबेडकरोत्तर पक्षांना विकले गेले. काही नेते  नवीन एका पक्षाची स्थापना करत स्वतः दुबळे बनले. आंबेडकरी नेत्यांच्या स्वार्थी आणि धनलोलुप वृत्तीमुळं आंबेडकरी चळवळ प्रस्थापितांच्या दावणीला बांधली गेली. काहींनी आम्ही स्वाभिमानी आहोत म्हणत स्वतंत्र आंबेडकरी पक्ष स्थापन केले. पक्ष स्थापन केले परंतु ते बांसाहेबांसारखे सर्व बहुजनांना पर्याय देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत हा तरुण वर्ग भरकटलेल्या वादळासारखा बेकामाचा पालापाचोळा गोळा करत दिशाविहिन झाला आहे. या प्रत्येक तरुणांमध्ये एक कार्यकर्ता आहे , परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन करत समाजाला पुढे नेणारा  पुढारी नाही आहे. आजही या तरुणाला आणि पर्यायाने आंबेडकरी चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज आहे.

जेंव्हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये , नेत्यांमध्ये या बाबतची जागृती होईल तेंव्हाच बाबासाहेबांचं  या देशातील सत्ताधारी लोकं बनण्याचं स्वप्न साकार होईल. जयंतीच्या नावाखाली चाललेला आडमुठेपणा बंद करायला हवा. तरुणांनी शिक्षण घेऊनच राजकारणामध्ये प्रवेश करायला हवा. बाबासाहेबांच्या उपदेशांचे पालन आणि आचरण  हीच त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने खरी आदरांजली होईल.

प्रेमकुमार शारदा ढगे(९८६०३०३२१६)
Premkumar.dhage@gmail.com

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...