नेहमी प्रमाणं रमेश जगदंबेच्या दर्शनाला निघाला. हा मार्ग तसा त्याच्या आंगवळणीच पडला होता. शेवटचा आधार असलेली त्याची बायको त्याला सोडून गेल्या नंतर जगदंबेलाच त्यानं शेवटचं आणि कायमचं दैवत मानलं होत. नेहमीच मंदिरात असल्या कारणानं त्याला बरेच जण देवीचा आरादी म्हणत, ज्यात त्याला अदृश्य अशी समाधानाची झळाळी मिळत असे. देवीची आराधना करायची , देवीकडे येणाऱ्या भक्ताचे त्याला दिसताच हात जोडून स्वागत होई. देवीसाठी नारळ सोलून देणे, भक्तांच्या चप्पला सांभाळणे , भाविक भक्तचे पडेल ते काम करण्यात त्याच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होई. त्याच्या ओसाड आणि भणंग घरापेक्षा मंदिरातच तो जास्त वेळ असे. गरिबीच्या आणि एकांताचा चिरफाड करणाऱ्या यातनेतुन देवीचं मंदिरच त्याला जगण्याची नवीन उमेद देत होतं.
आज अमावास्या होती. आज देवीच्या दर्शनाला कोणी येणार नव्हतं. त्यामुळं उद्या येणाऱ्या भक्तांच्या महापुरातून रामेशला उसंत सुद्धा मिळणार नव्हती. पण आज काय करायचं ? हा महत्त्वाचा प्रश्न होता. दर महिन्याला एकदिवस हि परवड व्हायचीच. रस्त्यानं जाताना त्याला बघणारे पाहून 'आज अमावस्या आहे वाटत..!' असं अनाहूतपणे बोलून जात होते. रमेश हा आज बाहेर फिरायलाय निघालाय म्हणजे आज नक्कीच अमावास्या होती हे लोकांनी गृहीतच धरलेलं होतं. पायात कोल्हापुरी जी त्याच्या वयाप्रमाणेच जुनाट झाली होती, अर्धवट पांढरे झालेले डोके, अंगात खमीस आणि पायात खमींसापेक्षा थोडी नवीन पण रंगाणं जुनच वाटणारं धोतर , खांद्यावर मातीने कळकस झालेला रुमाल हा त्याचा नित्याचा पेहराव, दुरूनच त्याची ओळख करून देई.
आठवडी बाजाराच्या हनुमान मंदिराच्या पुढच्या मैदानात आज भलतीच गर्दी होती. मंदिरात आज अमावास्याच्या असताना दिवसा दिवा जळत होता. तिथून पुढं पंधरा मिनिटाच्या अंतरावर खास गरीबांसाठीच्या असलेल्या स्वस्त हॉटेलात तो दर अमावस्ये सारखं जाऊन दही भात खाऊन येणार होता. आठवडी बाजाराच्या मैदानात त्याला गर्दीला बघण्याचा मोह आवरता नाही आला. जवळ जाऊन बघितलं तर तिथं एका डोंबऱ्याचा खेळ चालू असल्याचं लक्षात आलं. खूप सारे लोकं तो खेळ पाहण्यासाठी जमले होते. हातातली ढोलकी वाजऊन हा खेळ बघण्याचा आवाहन डोंबारी करू लागला. त्याची बायको गोल केलेल्या लोखंडी सळइतून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या शरीरापेक्षा कमी व्यास असलेल्या गोल कडीतून फारच कासावीस होत होती. आंग पिळल्यामूळं होणाऱ्या वेडणेंन ती विव्हळत होती. पण चेहऱ्यावर दुःखाचा अविर्भाव न दिसू देण्याचा खोटा प्रयत्न सारखा फसत होता. एकदाची मोठ्या प्रयत्नांन ती गोल सळईमधून बाहेर आली आणि लोकांनी सोबतच टाळ्यांचा गजर केला. ह्या टाळ्यांना आजूनच प्रोत्साहन देण्याचं काम डोंबारी आपली ढोलकि जोर जोरात पिटाळून इमाने इतबारे करत होता. हा सगळा प्रकार रमेश दुरूनच पाहत होता.
आता त्या डोंबाऱ्याची पोरगी दोन खांबावर बांधलेल्या दोरीवरून चालण्याचा पराक्रम दाखवणार होती. एवढ्या कोवळ्या वयात जीवाशी खेळायला लावणाऱ्या बापाचं काळीज खरच किती कठोर असावं. परंतु गरिबीच्या वेदना त्यापेक्षाही महाभयंकर आणि असह्य असतात हे रमेशला माहिती होत. छोट्या मुलीचा दोरीवरचा खेळ बघायला रमेश थोडा गर्दीच्या पुढे आला. हा हा म्हणता छोटी पोरगी दोरीवर बांबूच्या साहायाने चढली. दोन्ही हातात बांबू आडवा धरून स्वतःचा तोल सावरत ती दोरीवरुन पुढे चालत होती. सगळे लोकं पोरीची हि करामत आ वासून बघत होते. बापाच्या ढोलकीच्या आवाज जोर जोरात घुमत होता. छोटी छोटी बारिक पोर किंचाळत होती. नकळतच सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली. हे बघताना पोरीचा अचानक तोल गेला. पण काहीही दुर्घटना घडायच्या आताच तिने बांबूच्या आधाराने स्वतःला सावरलं. लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण तिच्यासाठी हे नवीन नव्हतं. दोरीवरून चालण्याचा खेळ केउं पोरगी खाली आली. तशी तिच्या बापाणे लोकांना काहितरी चिल्लर बक्षिस म्हणून देण्याची हात जोडून विनंती केली. आता मात्र बरीच गर्दी अचानक कमी झाली. काही छोटी मूल रुपया दिन रुपये त्यांच्या खाऊतले देत होती. काही मोठ्या मनाची माणसं पण होतीच जी फुल नाही फुलांची पाकळी देत होती. राधाकिसन मात्र पन्नासची नोट देऊन मिशावरून हात फिरवत मर्दांगीचा तोरा मिरवत गेला. रमेशनं सुद्धा क्षणाचाही विलंब न करता डोंबऱ्याचा पोरीच्या हातात पाच रुपायाची नोट दिली. 'पोरी जिवासंग एवढं नगं खेळत जाऊस. तुला आजून लै दुनिया बघायची हाये. जगदंब ....जगदंब...' देवीला हात जोडून तो तिथून निघाला.
आता त्याला जेवणाची आठवण झाली. पुढच्या हॉटेलात जाऊन तो जेवणारच होता . मात्र शेवटचे पाच रुपये आपण डोंबाऱ्याच्या पोरीला दिल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण त्याच नशीब बलवत्तर कि काय म्हणून त्याला वडाच्या झाडाखाली एक रुपया , दोन रुपये ,पाच रुपये असे एकत्र दहा ते वीस रुपयांची आरास भेटली. ती त्यानं लगेच उचलली आणि "जगदंबे तुलाच तुझ्या भक्तांची काळजी" असं म्हणत देवीला वंदन करत तो पुढे तडक हॉटेलाच्या दिशेने निघाला.
हॉटेलात गेल्यानंतर हॉटेल मालक दिनू काका , " आरं रमेश आरादी आला रं" , असं सांगत 'आज अमावस्या हाय वाटत' अस स्वतःशीच पुटपुटले. काही वेळातच रामेशा पुढं दही भात येऊन पोचला. रमेश साठी दही भात हे नेहमीचंच ठरलेलं असायचं.
"आर सावकाराचा बाप गचकला म्हण आज. त्येच्या पोरानं लय पैसे ववाळून टाकले म्हण म्हाताऱ्याच्या मड्यावरून , आमचा गोपीनाथ सांगत होता." शेजारी बसलेल्या दोन माणसांचं बोलणं रमेशच्या कानावर आलं. तसा तो स्तब्ध झाला. कारण त्याला वडाच्या झाडाखाली सापडल्या पैश्यांचा संदर्भ लागला होता. हनुमान मंदिरात दिवसा जळणाऱ्या दिव्याचा अर्थ त्याला उमजला होता. अमावस्येच्या दीवशी मड्यावरच्या पैस्यानं जेवावं कि नाही याची चलबिचल मनात होत होती. पण समोर दहीभात आणि स्वतःच्या गरिबीचा नाईलाज असल्यानं तो चोरासारखा पटापट जेवला. पैसे घेतांना हॉटेल मालक दिनू काका " काय रं रमिषा ह्याबार बक्कळ चिल्लर गोळा केलीस" असं म्हणत रामेशची टर उडवत होते.
त्याच्या बोलण्याकडे फारस लक्ष न देता रामेश हॉटेलातून बाहेर पडला. हनुमान मंदिराजवळ आल्यावर हातामध्ये कडू निंबाच्या झाडाचे पानं हातात घेऊन सावकाराच्या बापाचा अंत्यविधी करून आलेले लोकं रामेशला दिसले. मसनवाट्याकड पाहून हात जोडत रमेश म्हणाला, " सावकार असू कि कोणी रस्त्यावरच्या भिकारी असू, शेवटी सगळ्यांना मार्ग एकच! कुणाला उशीर तर कुणाला लवकर तिकडंच जायचं हाय. जगदंबे सगळ्यांना त्यांच्या जीवनाचा सफर सुखांन घडू दे ग माय.... जगदंब ...जगदंब...."
मागे हनुमान मंदिरात लावलेला दिवा तसाच झुळू झुळूं जळत होता...
©प्रेमकुमार शारदा ढगे.
986030326
No comments:
Post a Comment