अजयच्या ताईच्या घरून बुलेटवर " रॉयल" सफरीचा आनंद घेत आम्ही क्रांतीचौकला त्याच्या ऑफिसला जाणार होतो. पण समर्थ चौकात ट्राफिक पोलीसची गाडी असल्यामुळं आम्हाला मार्ग बदलावा लागला. शेवटी पोलिसांना चुकवत आणि हुलकावण्या देत आम्ही क्रांतीचौकला सुखरूप पोचलो, कारण अजय ज्या 'रॉयल' मस्तीत गाडी चालवत होता त्यावरून आम्ही व्यवस्थित पोचू कि नाही जरा शंकाच होती.
शेवटी कांबळे साहेबांच्या पॅशनवर आम्ही बाबा पेट्रोल पंपाकडं निघालो. जाताना रस्त्यातच जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत दिमाखात न्यायाची हमी देत सर्वाना अभिवादन करताना दिसली. हे अभिवादन स्वकारून पुढे गेलो. जात असताना "न्यायमंदिर, जिल्हा व सत्र न्यायालय" हे नाव अगदीच भाव खात होत.
तस हे नाव मी नेहमीच बघतो. पण या नावामध्ये आज "न्यायमंदिर" या शब्दाबद्दल थोडी शंका वाटली. न्यायालयाला "न्यायमंदिरच " का म्हटलं असावं..? न्यायदर्गा, न्यायचर्च, न्याय गुरुद्वारा, न्यायविहार अस का म्हटलं नसावं ..? न्यायमंदिर हा शब्द खरंच तेवढा सर्वंकष आणि सर्वसमावेशक आहे का..? 'न्यायमंदिर' या शब्दांमुळं खरच इतर सर्व जाती धर्माच्या लोकांचे धार्मिक आणि वैचारिक समाधान होत असेल का..? मंदिर या शब्दामुळं न्यायालयेसुद्धा आपण फक्त एका धर्मापुरते मर्यादित नाही का करून ठेवत..?
एकीकडे न्यायालयाला सर्व कायद्यायचे अर्थ लावण्याचे महत्वपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. परंतु संविधानाच्या ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार (१९७६) संवीधानाच्या प्रस्ताविकेमध्ये "धर्मनिरपेक्ष" हा शब्द प्रविष्ट करण्यात आला. यानुसार भारत देश कुठल्याही धर्माचा अधिकृतरित्या स्वीकार करत नाही. भारत देश सर्व धर्म हे एकसमान मानतो. धर्माबाबतीत पक्षपाती धोरण हे अस्वीकारहार्य आहे. मग असे असताना आपण न्यायालयाला "न्यायमंदिर" म्हणून संविधानाच्या उद्देशिकेचे उल्लंघन तर करत नाही आहोत ना ? या बाबतीत एका वकील मित्राशी चर्चा करणार आहेच.
आफगाणिस्थान मध्ये "आल्हा" हा शब्द फक्त मुस्लिमच वापरू शकतात आणि हा त्यांचाच अधिकार आहे असे अफगाणी कोर्टाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे 'मंदिर' हे फक्त हिंदू धर्माशीच संबधीत आहेत, निदान आपल्या भारतात तरी. भारतामध्ये कुठलाही मुस्लिम त्याच्या मस्जिदीला , ख्रीस्चन आपल्या चर्चला , शीख आपल्या गुरुद्वाराला किंव्हा बौद्ध आपल्या विहाराला 'मंदिर' संबोधित नाहीत. मग अशा परिस्थितीत जेंव्हा धार्मिक दंगली होतात तेंव्हा इतर धर्मियांनी काय म्हणून न्यायाची अपेक्षा या 'न्यायमंदिरा'कडून करावी.? मग खरच न्याय मंदिरात बसलेले न्याय देवता हे निःपक्षपातीपणे न्याय देतील कि नाही याबद्दल शंका निर्माण झाली तर यात गैर आणि वावगे वाटण्यासारखे काहीच नाही. हे अगदी स्वाभीविक आहे.
हा संभाव्य धोका लक्षात घेऊनच मागे कोल्हापूर जिल्ह्यात एका आय.पी.यस. अधिकाऱ्याने कोणत्याही ऑफिसमध्ये कुठल्याच देवाचे फोटो न लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत झाले होते. मात्र औरंगाबादचे काही अधिकारी शस्रपूजा करताना ,होळी खेळताना , असले अनेक फोटो मी वृत्तपत्रातून वाचले आहेत.याच्याही पुढची बाब म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री आषाढी एकादशीला सहपरिवार 'शासकीय' पूजा करतात. परंतु रमजान ईदला मात्र फक्त शुभेच्छा देतात आणि त्याही ट्विटर वरून. मग अशा वेळी एखाद्या मस्जिद मध्ये जाऊन पाच मिनिट नमाज अदा करायला काय हरकत आहे. नाही म्हणजे आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचा सन्मानार्थ तरी जायला काय हरकत आहे...? आणि इकडे जायचे नसेल तर तिकडे हि जाऊ नका " मुख्यमंत्री" म्हणून . कारण हे पद घटनात्मक आहे . हे पद घेऊन एका विशिष्ट धर्माबद्दल पक्षपात करण्याचा तुम्हालाच काय पण कुणालाच अधिकार नाही. वयक्तिक जाऊन पूजा अर्चना करायला कुणाचीही अजिबात हरकत नाही. परंतु आपल्याकडे असल्या पक्षपाती घटना सर्रास घडतात. किंबहुना कोणत्याही घटनात्मक अधिकाऱ्याने किंव्हा मंत्र्याने आपल्या खासगी धर्माला विसरून जावे किमान त्या पदावर असताना तरी . एवढे सौजन्य त्यांनी दाखवायला हवे. ते ज्या ठिकाणी जातील तोच त्यांचा धर्म दिसला पाहिजे . परंतु आपल्या कडील लोकं हे धर्माला तान्हाजी मालुसरेच्या घोरपडी सारखे चिकटून आहेत. 'धर्म' या एकाच शब्दावर आपल्याकडील सत्ता बदलून जाते.
एक गोष्ट मात्र आपण कुणीच नाकारू शकत नाही ,ती म्हणजे आपण कितीही 'धर्मनिरपेक्ष'तेचा ढोल पिटाळला तरी आपला राजकीय कल हा हिंदुत्वाकडेच झुकतो.यातूनच मग "न्यायालयाला 'न्यायमंदिर' म्हणणे, मुख्यमंत्र्यांनी एका विशिष्ट देवाची 'शासकीय'पूजा करणे, न्यायालयात 'भगवत गितेवर' शपथ घ्यायला बंधनकारक असणे" असले प्रकार घडतात. (याबद्दलही एका व्यक्तीने याचिका टाकली आहे ) ह्या सगळ्या गोष्टी देशाच्या अंतर्गत स्वास्थ्यासाठी मात्र हानिकारक आहे. याचाच फायदा शेजारील राष्ट्र सुद्धा घेतात. देशाला महासत्ता बनवायचे असेल तर धर्मवादातून 'धर्मनिरपेक्षते' शिवाय गत्यंतर नाही. धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाचे खास वैशिष्ठ आहे . म्हणून याचे भान सर्व घटनात्मक लोकांनी , संस्थांनी, आणि जागरूक नागरिकांनी ठेवायला पाहिजे....
प्रेमकुमार शारदा ढगे(९८६०३०३२१६)
premkumar.dhage@gmail.com
No comments:
Post a Comment