रिहर्सल संपऊन कॉलेजच्या बाहेर आलो. सोबत आकाश हि होताच. थंड पावसाच्या धारांमध्ये गरमागरम कॉफी पिऊन नेमकाच बाहेर आलो होतो. रसिका आणि प्रज्ञा या दोघी कॉलेज कॅम्पसच्या बाहेर गेल्यानंतरच आम्ही आमची बाईक बाहेर काढली. आगोदर दोन वेळेस बाहेर आलं कि पाऊस चालू झाल्यामुळं आमचं निघन रखडलं होतं . शेवटी कंटाळून निघालो एकदाचे.
थंडगार रिमझिम पावसाच्या धारा अंगावर झेलत, थंड आणि बोचऱ्या हवेचा स्पर्श होताना चराचर अंगावर काटा उभा राहत होता. टीप टीप पडणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या तालावर, उभ्या अंगात हुडहुडी भरलेली असताना, आकाशची मोटारसायकल भिजलेल्या डोक्यावरील पावसाचे थेंबं पँटवर उडवणाऱ्या वाऱ्यासोबत स्पर्धा खेळत होती. आणि हा वारा आम्हाला कधी जास्त तर कधी वेगात वाहून हुलकावण्या देत होता. कदाचित तो आमची परवड पाहून गालातल्या गालात हसत असावा. आभाळातून वरुण राजाही हा सगळा खेळ पाहून मिश्किल पणे हसत असावा. म्हणूनच कि काय ,पण तो सुद्धा मधातच आपल्या टपोऱ्या थेंबानी आकाशच्या हेल्मेटला सडकून काढू लागला. मी मात्र बापडा आकाशच्या पाठीमागे माझं तोंड लपवून त्याला चुकविण्याचा अयशस्वी प्रयत्न करू पाहत होतो. असो...
पाहता पाहता आकाशची बाईक मिलिंद कॉलेज पार करून ,छावणी मध्ये आली. आज हॉली क्रॉस शाळेजवळ सुद्धा पावसात पण खूप गर्दी होतो. कसेबसे पुढे आलो. सगळ्या गाड्यांच्या काचा पूर्णपणे बंद केलेल्या दिसत होत्या, आणि बऱ्याच गाड्यावाल्यांनी आपापल्या गाड्यांचे दिवे चालू केले होते. एक चारचाकी दूर असलेल्या खड्यातून पाणी उडवत गेली.पावसानं साचलेल्या आणि गढूळ झालेल्या पाण्याच्या सोनेरी रंगछटा माझ्या पँटवर आपसूकच उमटल्या. चारचाकी वाल्या ड्रायव्हरला शिव्या घालण्याची इच्छा झाली पण काही उपयोग नव्हता. "बुरा ना मानो होली है" यासारख "बुरा ना मानो बारिश है" हे मी स्वतः च ग्राह्य धरलं होत. शिवाय त्याच्या चारचाकीच्या सगळ्या काचाही बंद होत्या .
राजस्थानी हॉटेलच्या जवळ असल्या चौकामध्ये खूपच जास्त वाहतूक होती. गाडी खूपच हळून चालवत होता आकाश. समोरच्या स्कॉर्पियोचा लाल लाईट लागला, हे पाहुन आकाशन बाईक थांबवली.माझ्या मागे लगेच दुसरी मोटार सायकल येऊन थांबली. उजव्या हाताच्या मोकळ्या जागेत, काळ्या रंगाची प्लेजरवाली लाल रंगाचा टॉप घालून भेजलेले केसं सावरताना माझ्या नजरेतून सुटली नाहि. अगदी जवळ येऊन तिची गाडी थांबल्यामूळ थोडं अनकंफोर्ट वाटत होत मला आणि तिला सुद्धा. त्यामुळं माझी नजर मी डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेवर थांवबलेल्या लोकांकडे वळवली. रस्त्याच्या कडेला खूप साऱ्या महिला आमच्या गाड्या पुढे जाण्याची वाट पाहत थांबल्या होत्या.
दोन बाया एकाच छत्रीमध्ये स्वतःला पावसापासून लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. या सगळ्या गर्दीमध्ये मला रस्त्याच्या एका कोपऱ्यात अगदी नव्वद अंशाच्या कोनामध्ये वाकलेली म्हातारी दिसली. एका ह्यामध्ये काठी आणि दुसरा हात तिच्या डोक्यावर असलेल्या प्लास्टिकच्या कापडाला सावरत होता. ते कापड वाऱ्याच्या वेगानं सारख हालत उडून जाण्याचा प्रयत्न करत होत. म्हातारी त्याला तसच खाली वाकून घट्ट पकडून ठेवत होती. म्हातारीला तिच्या समोर वाहने उभी आहेत हे सुद्धा स्पष्ट दिसत नसावं कारण ती पूर्णपणे कमरेमधून खाली वाकली होती. तिच्या प्लास्टिकच्या कापडामधून सुटलेल्या पांढऱ्या केसावरून खाली पडणारे पाणी स्पष्ट दिसत होते. वयाने नक्कीच सत्तरीच्या पुढे असायला पाहिजे होती ती. शेजारी उभ्या असलेल्या बायांकडं पाहून "आग मला कुणीतरी तिकडं नेऊन सोडा ग" अशी विनवणी करू लागली. दोघीत एक छत्री शेअर करणाऱ्यापैकि एकजण बोलली. "म्हातारे कशाला आलीस. पावसापण्याचं घरीच बसायचस कि." हे ऐकताना मान वर करून पाहताना म्हातारीच्या डोक्यावरचे कापड उडून जाणार एवढ्यात तिने ते परत एकदा घट्ट पकडून ठेवले.
हे बघून मी आकाशला , "आकाश मी सोडू का रे त्या म्हातारीला ?" अस विचारलं. पण हेल्मेट डोक्यावर असल्यामुळं त्याला ऐकायला नाही आलं. हे बघून उजव्या हाताची 'प्लेजरवाली' गालातल्या गालात हसली. मागचे लोक हॉर्न वाजउ लागले. काढा लवकर गाड्या , रस्ता मोकळा करा अस आजूबाजुवाले सुचउ लागले. आकाश ने बाईकचा वेग वाढवला तसा मागे वळून पाहत असताना पावसात भिजत अर्ध्यामध्ये वाकलेली आजीबाई फारच केविलवाणी दिसू लागली. बाईक दूर जाईल तशी आजी माझ्या नजरेपासून दूर चालली होती.
काहि क्षणातच थोडं दूर गेलं असताना फोनची रिंग वाजली. फोन होता माझ्या स्वतः च्या आजीचा."पप्पू, पाऊस चालू आसन तर पासापाण्याचं बाहिर फिरू नको बरका..! " हे ऐकताना माझ्या मनात पावसात भिजणाऱ्या आजिच्या नातवाचा विचार आला. ...
प्रेमकुमार शारदा ढगे
premkumardhage. blogspot. com
No comments:
Post a Comment